Wed, Feb 20, 2019 20:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लव-कुशची जोडी तुटली

लव-कुशची जोडी तुटली

Published On: Sep 04 2018 8:05AM | Last Updated: Sep 04 2018 1:38AMधारावी :  अरविंद कटके

धारावीतील संत कक्कया मार्गावरील गुलमोहम्मद चाळीत दहीहंडी  फोडण्यासाठी  दुसर्‍या थरावर उभ्या असलेल्या कुश अविनाश खंदारे (26)या गोविंदाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाला. उत्साह आणि जल्लोषात साजर्‍या होत असलेल्या उत्सवावर या घटनेने शोककळा पसरली. 

लव आणि कुश हे जुळे भाऊ होते;  कुशच्या मृत्यूने ही जुळ्या भावांची जोडी तुटली. कुश हा अविवाहीत होता. लव व कुश ही  जुळी भावंडे  खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबाला आधार देत होते. कुशची तब्बेत खराब असल्याने त्याने आज गोविंदा पथकाबरोबर न जाण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र गोविंदा पथके  जात असल्याचे पाहून  हंडी पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही. तो दहीहंडीचा उत्सव पहाण्यासाठी थेट मैदानात पोचला.  मात्र तेथील  जल्लोष पाहून तो खेळण्यासाठी पुढे सरसावला. उंच बाध्याचा कुश खंदारे दुसर्‍या थरावर चढला. थरावर थर चढत असताना त्याला अचानकपणे भोवळ आली आणि तो खाली पडला.  खाली उभे असलेल्या गोविंदानी त्याला झेलले. चाळीतील मुलांनी तात्काळ त्याला शिव रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे  डॉक्टरांनी सांगितले. 

या घटनेनंतर चाळीतील हंडी खाली उतरविण्यात आली. कुश च्या मृत्युचे वृत्त येताच कुटुंबियांनी फोडलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.सार्वजनिक कामात आघाडीवर राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणुन लोकप्रिय असलेल्या कुशचा अचानक झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला.