Fri, Apr 26, 2019 04:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुरुंदकरच बिद्रेंचा खुनी

कुरुंदकरच बिद्रेंचा खुनी

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 1:06AMमुंबई : वृत्तसंस्था

नवी मुंबईतील बेपत्ता पोलिस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच अश्विनी यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून, तसा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोबाईल चॅटिंगमधील केवळ एका अक्षरावरून कुरुंदकर हाच मारेकरी असल्याचे समोर आले आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

अश्विनी यांच्या मोबाईलवरून ‘हाऊ आर यू’ हा प्रश्न विचारताना कुरुंदकरने ‘यू’ लिहिताना ‘वाय’, (ध) हे अक्षर वापरले. मात्र, अश्विनी कधीही ‘यू’ लिहिताना ध वापरत नसत त्या नेहमी ण वापरत. हाच धागा पकडून गुन्हे शाखेने कुरुंदकरला अटक केली. अभय कुरुंदकरचे नातेवाईक, मित्रांकडूनही पोलिसांनी या गोष्टीची खात्री करून घेतली आहे. यादरम्यान केलेल्या तपासामध्ये मित्रांशी चॅटिंग करताना कुरुंदकर ‘यू’ लिहिताना नेहमी ‘ध’ वापरत असल्याचेही आढळले. अश्विनी यांच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली असता अश्विनी ‘यू’ लिहिताना कधीही ‘ध’ वापरत नसत, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे स्पष्ट झाले.

अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत आहेत, असे भासवण्यासाठी कुरूंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरून मेहूणे अविनाश गंगापूरे यांना व्हॉट्सअप मॅसेज केला होता. मानसिक अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी 5 ते 6 महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहोत, असे या मॅसेजमध्ये म्हटले होते.

अभय कुरूंदकरनेच एप्रिल 2016 मध्ये अश्विनीच्या डोक्यात बॅट मारून तिची हत्या केली, अशी कबुली कुरूंदकरचा बालपणीचा मित्र व या प्रकरणातील सहआरोपी महेश पळणीकर याने पोलिसांना दिली होती.

अश्‍विनी - अभयचे प्रकरण असे 

- अश्विनी बिद्रे पोलिस दलात 2005 साली रूजू झाली. सांगलीत पोस्टिंग असताना तिची अभय कुरुंदकरशी ओळख झाली.
- पुढे दोघांत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अश्विनी व अभय कुरूंदकर हे दोघेही त्यापूर्वीच विवाहित होते व त्यांना पत्नीसह मुले होती.
- कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले त्यामुळे तिने पती राजू गोरेसोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. ती पित्याकडे राहत असे.
- यानंतर अश्विनीने अभय कुरूंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचेच नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे व्हायची.
- मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या करण्याचा कट रचला.
- यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले व अश्विनीला संपवून टाकले. या प्रकरणात या दोघांना राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी यांनी साथ दिली.
- अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून हत्या केली व महेश फळणीकर व राजू पाटीलच्या मदतीने वसई- भाईंदरच्या खाडीत फेकून विल्हेवाट लावली.
- अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होता.