Thu, Feb 21, 2019 13:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्ला स्थानकाची संरक्षक भिंत ढासळली; चौघे जखमी

कुर्ला स्थानकाची संरक्षक भिंत ढासळली; चौघे जखमी

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:32AMकुर्ला : वार्ताहर

कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेली रेल्वे स्थानकाची संरक्षक भिंत कोसळून चार जण जखमी झाले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये दोन दुचाकींचेही  नुकसान झाले आहे.

ही भिंत पडल्याने  लखन साबुराव खताल (29) रा.  मानखुर्द, अमीर असीम खान (58) रा.  कुर्ला, लक्ष्मण विष्णू पाटील (50)रा.   कुर्ला, व मोहम्मद सिराज पेंटोजी (30)  रा. कुर्ला हे चौघे जखमी झाले. त्यांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  यातील अमीर खान यांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.

कुर्ला रेल्वे स्थानकाला लागून असलेली  व अंदाजे 12 फुटांपेक्षा जास्त उंच असलेली भिंत जीर्ण झाली होती. यातून  झाडांची मुळे देखील बाहेर आली होती. या भिंतीच्या  बाजूने रस्ता असल्याने  तेथून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा होत असते. त्यामुळे ही भिंत लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली होती. 

मात्र  रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे  जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदतकार्य सुरू केले. 

याबाबत रेल्वे प्रवासी परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका केली.  एखादी दुर्घटना घडली की अधिकारी जागे होतात. तक्रार देऊनही ज्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.