होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर; मुख्यमंत्र्यांवर सोपवली जबाबदारी!

कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर; मुख्यमंत्र्यांवर सोपवली जबाबदारी!

Published On: Feb 20 2018 2:00AM | Last Updated: Feb 20 2018 1:10PMमुंबई : राजेश सावंत

मुंबईतील उत्तर भारतीयांची ताकद गेल्या दशकात वाढली आहे. यासाठी भाजपाने काँग्रेसमधील उत्तर भारतीय लॉबी फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यात मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसपासून दुरावलेल्या उत्तर भारतीय नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. आता तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह भाजपाच्या वाटेवर असल्याचे समजते. विशेष म्हणजे याची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून उत्तर भारतीय मतदारांवर तरलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

मुंबईत गेल्या दशकात उत्तर भारतीय मतदारांची संख्या 15 ते 20 टक्केने वाढली आहे.  फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकूण 98 लाख मतदारांपैकी सुमारे 35 टक्केपेक्षा जास्त उत्तर भारतीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या  निवडणूकीत 20 पेक्षा जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आले. मुंबईतील उत्तर भारतीय समाज हा सुरुवातीपासून काँग्रेसचा पारंपारिक मतदार असल्यामुळे याचा थेट विधानसभा व लोकसभा निवडणूकीवर परिणाम होतो. त्यामुळे भाजपाने उत्तर भारतीय समाजाला डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यात काँग्रेसने मुळ शिवसैनिक असलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपवल्यामुळे उत्तर भारतीय नेते दुखावले गेले. त्यामुळे काँग्रेसमधील उत्तर भारतीय नेत्यांनी थेट भाजपाचा रस्ता पकडला आहे. माजी आमदार कृपाशंकर सिंह यांचे खंद्दे समर्थक डायमन किंग मोहित कुंबोज यांना भाजपात आणून काँग्रेसची आर्थिक बाजू कमकूवत केली. 

संयज निरुपम यांचे कट्टर समर्थक हिंन्दी सामनाचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्‍ला व त्यानंतर दिंडोशीचे माजी आमदार राजहंस सिंह यांना भाजपात प्रवेश देऊन, काँग्रेसची उत्तर भारतीय फळी कमकूवत केली. आता तर, कृपाशंकर सिंह यांची बेहिशोबी मालमत्तेतून सहिसलामत सुटका करण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लावून, सिंह यांना भाजपात येण्याचे थेट आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे याची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारली असून सिंह यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. पण सिंह यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचे पुनर्वसन कुठे करायचे, यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अजून एकमत झालेले नाही. 

कृपाशंकर सिंह यांना राज्यातील राजकारणात राहायचे असल्यामुळे त्यांना सांताक्रूझ कलिनामधून भाजपाची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कलिना हा कृपाशंकर सिंह यांचा बालेकिल्ला असल्यामुळे त्याचा भाजपाला मोठा फायदा होऊ शकतो. पण सिंह यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.