Fri, Apr 26, 2019 03:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोयना, टाटा प्रकल्पांचे पाणी टप्प्याटप्प्याने भीमेत 

कोयना, टाटा प्रकल्पांचे पाणी टप्प्याटप्प्याने भीमेत 

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 2:03AMमुंबई : चंद्रशेखर माताडे 

कोयना व टाटा वीजनिर्मिती प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून ते दुष्काळी भागातील भीमा नदीच्या खोर्‍यात वळविण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत नेमके काय करता येईल, यासाठी राज्य सरकारने एका अभ्यासगटाची स्थापना केली आहे. त्यामुळे वीजनिर्मितीनंतर कोकणातून थेट समुद्रात जाणार्‍या या पाण्याचा वापर दुष्काळ हटविण्यासाठी  करण्याच्या आराखडा आकाराला येणार आहे. 

राज्यात टाटांचा प्रकल्प हा सर्वात जुना आहे. मुळशी व इतर धरणातून भीमा उपखोर्‍यातील  सुमारे 42. 50 टीएमसी पाणी हे गेल्या 90 वर्षांपासून टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी  वळविण्यात येत आहे. यावरील भाग हा पाण्याच्या तुटीचा आहे. त्यामुळे या भागात केवळ सिंचन व औद्योगिक कारणासाठी नव्हे तर वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

त्याचबरोबर कोयना जलविद्युत प्र्रकल्पातुन 67. 5 टीएमसी पाणी सोडले जाते. हे पाणी वीज निर्मितीनंतर कोकणात जाते. मध्यंतरी  कृष्णा पाणी तंटा लवादाने त्या त्या खोर्‍याबाहेर पाणी वळविण्याची सर्वोच्च मर्यादा निश्‍चित करून दिली आहे. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी व शेतीच्या वापरासाठीच्या पाण्यानंतर वीज निर्मितीसाठीचा क्रमांक लागत आहे.  अलिकडच्या काळात वीज तयार करण्याचे अनेक पर्यायही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जलविद्युत निर्मितीवरही मर्यादा येणार आहे. 

तुटीच्या म्हणजेच दुष्काळग्रस्त भागाकडे हे   पाणी कसे वळविता येईल याचा अभ्यास केला जाणार आहे. पाण्याची मागणी असलेला भाग हा कमी पावसाचा असल्याने तेथे सिंचन प्रकल्प घेण्याबाबत असलेल्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. 

त्या पार्श्‍वभूमीवर कोयना व टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी वापरले जाणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबतच्या सर्व पर्यायांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे यांच्या अध्यक्षतेखाली  नऊ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

अभ्यासगटाची कार्यकक्षा
  टाटा प्रकल्पासाठी पश्‍चिमेकडे वळविलेले पाणी दुष्काळी पूर्व भागाकडे वळविणे.
  भीमा खोर्‍यात हे पाणी वळविण्यासाठी वर्षनिहाय टप्पे ठरविणे.
  वीजनिर्मितीसाठीचे पाणी टप्प्याटप्याने कमी करणे.
  वीजनिर्मितीची यंत्रणा कार्यक्षमतेने वापरण्यासाठी उपाय सुचविणे.
  कोकणचे पाणी कमी होणार असल्याने त्यावर उपाय  सुचविणे.