होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोयना धरणप्रश्‍नी टास्क फोर्स नेमणार 

कोयना धरणप्रश्‍नी टास्क फोर्स नेमणार 

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

 कोयना धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत टास्क फोर्स नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार कार्यवाही केली जाईल. तसेच ज्यांनी खासगी गावठाण तयार केले त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील, अशी घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली. 

 ही लक्षवेधी मांडताना शंभूराज देसाई यांनी धरणग्रस्तांच्या अडचणींचा पाढा वाचला. हे धरण झाले त्यावेळी पुनर्वसनाचा कायदा नव्हता. त्यामुळे त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत धरणग्रस्तांच्या सोयीसुविधांसाठी 3 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तो निधी अधिवेशन संपण्यापूर्वी देण्यात यावा. 98 ते 100 गावे या धरणामुळे बाधित झाली. त्यापैकी 54 गावांना सरकारने गावठाण मंजूर केले, पण इतर गावातील लोकांनी खासगी गावठाण केले त्यांना कोणत्याही नागरी सुविधा दिल्या नाहीत. त्यांना किमान शाळा, वीज, पाणी, रस्ते व आरोग्याच्या सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. धरणात न गेलेली 900 हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्याला राज्यमंत्री कांबळे यांनी मंजूर निधी 15 दिवसांत देण्यात येईल. ज्या गावांना नागरी सुविधा देण्यात आल्या नाहीत त्या दिल्या जाणार आहेत. धैर्यशिल पाटील, बाळासाहेब पाटील यांनी प्रश्‍न विचारले.