होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव भीमाः आठ कोटींची भरपाई

कोरेगाव भीमाः आठ कोटींची भरपाई

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:54AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

कोरेगाव भीमा दंगलीत नुकसान झालेल्यांना सुमारे आठ कोटी रुपये भरपाई देण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे समजते. तसेच या घटनेची साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिच्या कुटुंबीयांना पुणे शहरात सदनिका व घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यावर मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे एकमत झाल्याचे समजते.

आंबेडकरी अनुयायांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर समाजकंटकांनी तेथील परिसरात दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेत अनेकांच्या घरांचे व दुकानांचे नुकसान झाले. या नुकसानीचे स्थानिक पातळीवरील महसूल यंत्रणेने पंचनामे करून झालेल्या नुकसानीबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता.  अहवाल प्राप्तीनंतर नुकसानग्रस्तांना शंभर टक्के भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. राज्यात शंभर टक्के नुकसानभरपाई दिलेली ही पहिलीच घटना असल्याचे महसूल अधिकार्‍याने सांगितले.कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेची पूजा सकट ही एकमेव साक्षीदार होती. मात्र, काही दिवसांनी ती विहिरीत पडून मरण पावली. तिच्या कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती विचारता घेऊन, सकट कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी त्यांना पुणे शहराच्या हद्दीत घर देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करण्यात येणार आहे.