Tue, Jan 22, 2019 07:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोपरखैरणेत पोलिसांवर दगडफेक

कोपरखैरणेत पोलिसांवर दगडफेक

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 2:05AMऐरोली ः वार्ताहर '

कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळील आठ भूखंडांवरील शंभरहून अधिक अनधिकृत झोपड्यांवर सिडकोद्वारे आज (दि.5) कारवाई करण्यात आली. दरम्यान, संतप्त झोपडपट्टीवासियांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे, पोलीस निरीक्षक गुणेंसह अन्य पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान दगडफेकीत एक पोकलन व पोलिसांच्या तीन गाड्यांचे नुकसान झालेे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच कारवाई केल्याने झोपडपट्टीवासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोपरखैरणे रेल्वेस्थानका जवळील काही भूखंड सिडकोने निविदा पद्धतीने विक्री केले आहेत. यातील काही भूखंडांची विक्री करण्यात आली नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले. यापूर्वी अनेकवेळा सिडकोने या ठिकाणी कारवाई केली. मात्र अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात यश आले नव्हते. गेल्या सहा वर्षांपासून या भूखंडावर अतिक्रमण करणे सुरुच आहे. हा भूखंड सिडकोचा असल्याने महापालिकेकडून कारवाई केली जात नव्हती आणि सिडकोनेही पाहिजे तसे लक्ष दिले नसल्याने झोपडपट्टी वाढत गेली. दरम्यान, मंगळवारी सिडकोने या झोपडपट्टीवर कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू होताच नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे, पोलीस निरीक्षक गुणे यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाईसाठी सिडकोने नोटीस पाठवली होती. पण योग्य वेळी सिडको व महापालिकेनेही ठोस कारवाई न केल्याने झोपडपट्ट्या वाढल्याचा आरोप केला जात आहे. आजच्या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंंतर सीबीडी, कोपरखैराणे आणि ऐरोली पोलिसांची अतिरिक्त कुमक तसेच राखीव पोलीस दलालाही बोलवण्यात आले होते.