होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणपतीसाठी कोकणचा प्रवास टोल फ्री!

गणपतीसाठी कोकणचा प्रवास टोल फ्री!

Published On: Sep 07 2018 1:24AM | Last Updated: Sep 07 2018 1:22AMमुंबई : खास प्रतिनिधी

गौरी-गणपतीसाठी पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. सणासाठी या मार्गाने जाणार्‍या वाहनांना टोल आकारण्यात येणार नाही. मंत्रालयात गुरुवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वाहनांना आरटीओकडून स्टिकर्स दिली जाणार आहेत.

गणेशोत्सवासाठी मुंबईतून लाखो लोक कोकणात जात असतात. मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे असल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाऐवजी पुणे-कोल्हापूरमार्गे जाणे कोकणवासीय पसंत करतात. मात्र, या मार्गावर टोल भरावा लागतो. यावर उपाय काढण्यासाठी सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी जाणार्‍या वाहनांना टोलनाक्यांवरून सूट, तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर हे यावेळी उपस्थित होते.

पुणे व कोल्हापूरमार्गे जाणार्‍या गणेशभक्‍तांच्या वाहनांना दि. 10 ते 13 सप्टेंबर आणि त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर 23 सप्टेंबरपर्यंत या रस्त्यावर पथकरातून सवलत दिली जाणार असून, एस.टी. बसेसचाही यात समावेश असल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी दिली. याखेरीज मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, तसेच रस्त्यामध्ये वाहन बंद पडल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास त्याकरिता आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रस्त्यावर ठिकठिकाणी रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था असेल. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्‍त ट्रॅफिक वॉर्डन, वाहतूक पोलिस आणि डेल्टा फोर्स या यंत्रणांची कुमक वाढवावी, तसेच पथकर नाक्यावरील वाहनांची कोंडी होऊ नये याकरिता लेनचे स्ट्रॅगरिंग करणे, हँड मेड मशिनसह अतिरिक्‍त कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

कोकणात जाणार्‍या वाहनांना गणेशोत्सव-2018 कोकण दर्शन असे लिहिलेले स्टिकर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिले जाणार असून, गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवानंतर येताना गणेश विसर्जनापर्यंत हे स्टिकर्स असलेल्या वाहनांनाच टोलमधून सवलत मिळेल. अशीच सवलत वाशी टोलनाक्यावरून जाणार्‍या वाहनांना देखील दिली जाणार आहे. पाली-वाकण, पाली-खोपोली रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या असल्याचे शिंदे म्हणाले.