Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नाणार’वरून भाजप-सेना आमने-सामने

‘नाणार’वरून भाजप-सेना आमने-सामने

Published On: Apr 24 2018 2:03AM | Last Updated: Apr 23 2018 8:41PMमुंबई : उदय तानपाठक

कोकणातील नाणार प्रकल्पावरून आता शिवसेना आणि भाजप थेट आमने-सामने आले असून, युतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. नाणार येथील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्यानंतर अवघ्या तासा-दोन तासातच मंत्र्यांना असा अधिकारच नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पार तोंडघशी पाडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

नाणार येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मात्र, या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द करावी आणि मगच नाणारमध्ये यावे; अन्यथा त्यांच्या दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याचे नाणारवासीयांनी जाहीर केले होते. अखेर आज उद्धव यांच्या सभेतच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही अधिसूचना रद्द केल्याचे जाहीर करून टाकले. पाठोपाठ उद्धव यांनीही आता हा प्रकल्प होणार नाही, त्यामुळे नाणारवासीयांनी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहनही केले.

शिवसेनेची कोंडी

मात्र, तिकडे नाणारमध्ये उद्योगमंत्र्यांनी केलेली घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या काही तासात मुंबईतून रद्दबातल ठरवली. अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार उद्योगमंत्र्यांना नाहीतच, त्यांचे ते व्यक्‍तिगत मत असावे, असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. अधिसूचना रद्द करण्याचे सर्वाधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे असून, ही समितीच याबाबत योग्य निर्णय घेईल, तसेच हा निर्णय महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या हिताचाच असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनाच थेट अंगावर घेतल्याने आता शिवसेना कोणते पाऊल उचलते, हे पाहावे लागेल.

Tags : Konkan Nanar Project, Shiv Sena, BJP, directly face to face,