होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना-भाजपात रंगणार चुरशीचा सामना

शिवसेना-भाजपात रंगणार चुरशीचा सामना

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:34AMठाणे : प्रतिनिधी

25 जून रोजी होणार्‍या कोकण पदवीधर विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार  संपला. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांत कमालीची चुरस दिसत असून दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 

शिवसेनेच्यावतीने संजय मोरे यांच्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर भाजपकडून रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराची जबाबदारी पेलली. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे. दरम्यान शनिवारी सर्वच पक्षांनी प्रचाराच्या समारोपाच्या पत्रकार परिषदा घेऊन आपल्या विजयाचा दावा केला. 
ठाण्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. अनंत गीते, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, विनायक राऊत असे पाच खासदार, 16 आमदार, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका, बदलापूर, अंबरनाथ, पालघर नगरपरिषद, जव्हार नगरपरिषदा, मोखाडा नगरपंचायत, वाडा नगरपंचायत, रत्नागिरी नगरपरिषद, ठाणे आणि पालघर जिल्हा परिषद यांखेरीज शेकडो नगरसेवक, ग्रामपंचायती, पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. 

स्वतः आदित्य ठाकरे यांनी मनोर, पालघर, वसई, विरार, मीरा रोड, कुडाळ, हातखंबा, चिपळूण, महाड, पाली, श्रीवर्धन, पनवेल, ठाणे असा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील कुडाळ, कणकवली, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, महाड, पनवेल, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड, मनोर, पालघर, वसई, विरार अशा संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. शिवसेना प्रथमच या मतदार संघाच्या रिंगणात उतरली आहे. 
गोकुळ कदम, मिलिंद कांबळे या दोन अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेचे संजय मोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करून नंतर अर्ज माघारी घेणारे वसई येथील समाजसेवक बॅरी डाबरे यांनीही मोरे यांना पाठिंबा दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा ठाणे विभाग, डॉक्टरांच्या विविध 29 संघटनांची शिखर संघटना असलेली जनरक्षा, जुनी पेन्शन हक्क संघटनेसह 20 हून अधिक  संघटनांनी संजय मोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

दुसरीकडे भाजपचे निरंजन डावखरे यांनी याच मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. मतदार संघाची गणिते, रणनीती याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. शिवाय त्यांचे वडील दिवंगत वसंत डावखरे यांचे सर्वपक्षीयांशी असलेले चांगले संबंध हीदेखील त्यांच्या जमेची बाजू आहे. बेलापूरच्या मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकूर, ठाण्याचे संजय केळकर, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण, विष्णू सवरा, अंबरनाथचे किसन कथोरे असे कोकण पट्ट्यात भाजपचे  पाठबळ आहे. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने डावखरे यांनाच पाठिंबा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राणे यांच्याच ताब्यात असून जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा वरचष्मा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा आमदार नसला तरी तिथे भाजपची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. विशेषतः रत्नागिरी, गुहागर या पट्ट्यात भाजपची ताकद लक्षणीय आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे. कारण ते डोंबिवलीचे आमदार असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष बांधणीत त्यांचे बारकाईने लक्ष असते. शिवाय ते रायगडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी दोन वेळा दक्षिण कोकणचा दौरा केला असून निरंजन डावखरेदेखील झोकून देऊन प्रचारात उतरल्याचे दिसून आले. 

बहुजन विकास आघाडीने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. राजकीय परिस्थिती पाहता पारंपरिक  मतदार आणि भाजपचे नेटवर्क यावर डावखरे यांनी भिस्त असून लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटना यांच्यावर संजय मोरे यांची मदार आहे.

डावखरे यांच्या रुपाने हा मतदार संघ पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. जितेंद्र आव्हाड, सुरेश लाड, भास्कर जाधव, रमेश कदम असे कोकण पट्ट्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीला मानणारा पारंपरिक मतदारही आहे. शिवाय किनारी भागात असणारी मुस्लिम मते राष्ट्रवादीसाठी आणि पर्यायाने नजीब मुल्‍ला यांच्यासाठी फायदेशीर ठरतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात बर्‍यापैकी ताकद असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.