Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपने राष्ट्रवादीकडून खेचून आणला कोकणचा गड 

भाजपने राष्ट्रवादीकडून खेचून आणला कोकणचा गड 

Published On: Jun 30 2018 1:43AM | Last Updated: Jun 30 2018 1:27AMठाणे : प्रतिनिधी

भाजपमधील अंतर्गत कलह आणि स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या सर्वपक्षीय मैत्रीमुळे राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपाचा बालेकिल्ल्याला सुरूंग लावले. त्याच डावखरे यांच्या हाती कमळ देऊन भाजपने पुन्हा एकदा कोकण काबीज केला आणि आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेशी दोन हात करण्यास सज्ज असल्याचे अधोरेखीत केले. कारण भाजपच्या विजयी उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही.

शिवसेनेच्या मतांवर भाजपचा उमेदवार जिंकून येतो, असा प्रचार करीत शिवसेनेने पहिल्यांदाच कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविली. आतापर्यंत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन युतीचा धर्म पाळला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मिळून कोकण पदवीधर मतदार संघ बनलेला आहे. या मतदार संघात फक्त 1 लाख 4 हजार 264 मतदार होते, तर 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. शिवसेनेने संजय मोरे यांच्या रुपाने पहिल्यांदा शिवसेनेने उमेदवार उतविल्यामुळे तिरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे, सेनेचे संजय मोरे आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांच्यात झालेली अपेक्षित लढत पाहायला मिळाली. 

आतापर्यंत शिवसेनेच्या मतावर भाजपचा उमेदवार जिंकून येत होता, असा प्रचार करताना शिवसेना स्टाईलने निवडणूक लढविल्याने भाजपचे डावखरे यांना विजयासाठी आवश्यक असणारी 35 हजार 143 मते मिळू शकली नाहीत. पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या पसंतीच्या मते मिळूनही  कोटा पूर्ण न झाल्याने रिंगणातील उमेदवार एकमेव म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी भाजपच्या उमेदवार विजयी झाल्याचे घोषित केले. ही रस्सीखेच सकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू होती, यावरून शिवसेनेने भाजपला किती काट्याची टक्कर दिली, याची प्रचिती मिळते. पालघर लोकसभा निवडणुकीप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संघटन कौशल्याची झलक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिली.

ही निवडणूक डावखरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिक प्रतिष्ठेची केली होती. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा पहिल्यांदाच निवडणूक लढवित होता. त्याच डाव खरे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कमळ त्यांच्या हाती दिले आणि सारी समीकरणे बदलून गेली. भाजपमधील इच्छूक नाराज झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड  यांनी संपूर्ण ताकदीनिशी नजीब मुल्ला यांना रिंगणात उतरवून डावखरे यांचा पाडाव करण्याची रणनिती आखली. 

सेना आणि राष्ट्रवादीच्या रणनितीमुळे या निवडणुकीत रंगत आली. रायगडमधील राष्ट्रवादीची मते पक्षाच्या उमेदवारालाच मिळावी, यासाठी फासे टाकण्यात आले. मनसे, स्वाभिमानी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी वाढल्या आणि भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत भर पडू लागली. परंतु स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपला मदत केली आणि कोकणचा बालेकिल्ला डावखरे यांच्यारुपाने पुन्हा मुख्यमंत्र्यांनी काबीज केला. त्याचवेळी मतदारांनी कसे मतदान करावे, याबाबत कार्यकर्त्यांकडून मतदारांना निट समजावून सांगण्यात न आल्याने तब्बल 4 हजार 816 मते बाद झाली तर 336 मते नोटा होती.

70 हजार 285 मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना 29 हजार 35 मते तर नजीब मुल्ला यांना 14 हजार 625 आणि संजय मोरे यांना 23 हजार 258 मते होती. याठिकाणी रिंगणात 14 उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक 35 हजार  143 मतांचा कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या 11 उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे 29 हजार 2014, मुल्ला 14 हजार 821 आणि मोरे 24 हजार 704 अशी मतसंख्या वाढली. तरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसर्‍या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली.

यामध्ये 1269 मते संजय मोरे यांना आणि 987 मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची 30 हजार 191 तर संजय मोरे यांची 24 हजार 704 मतसंख्या झाली. यावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे 4.15 वाजता दुसर्‍या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य 32 हजार 831 इतके झाले. आवश्यक तो 35 हजार 143 मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केले.