Sat, Aug 24, 2019 23:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकण पदवीधर मतदारसंघात पळवापळवीचे राजकारण

कोकण पदवीधर मतदारसंघात पळवापळवीचे राजकारण

Published On: May 27 2018 1:23AM | Last Updated: May 27 2018 1:19AMठाणे : दिलीप शिंदे

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी होणार असल्याने सर्वपक्षीय इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकताच भाजपकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून शिवसेनेने देखील रणनीती बदण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात शिवसेनेचा भगवा ताठ ‘माने’ने फडकण्यासाठी रत्नागिरीमधील भाजपच्या एका माजी आमदाराला शिवसेनेचा ‘विनय’शील उमेदवार बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

भाजपमधील पक्षांतर्गत कलहामुळे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय केळकर यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विधानपरिषदेचे दार उघडले गेेले. केळकर यांना दुसर्‍यांदा उमेदवारी न देता रत्नागिरीमधील कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी झाली होती. त्यावेळी माजी आमदार बाळ माने, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. कोकणातील एका मंत्र्याला देखील कोकणातील उमेदवार हवा होता. मात्र पक्ष नेतृत्वाने केळकर यांच्यावर विश्‍वास टाकला.  कै. वसंत डावखरे यांचे सर्व पक्षीय संबंध आणि मातोश्रीशी असलेला सलोखा हे निरंजन डावखरे यांना उपयुक्त ठरले. डावखरे यांच्या निधनामुळे त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता मावळल्याने निरंजन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. शिवसेनेकडूनही त्यांना आमंत्रण होते. 

विजयाची राजकीय गणिते लक्षात घेऊन निरंजन यांनी धनुष्यबाणाऐवजी कमळाला पसंती दिली. त्यांचा बुधवारी पक्ष प्रवेश आणि त्याच क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाण्यातील काही आजी-माजी नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षनिष्ठेला डावलले जात असल्याची भावना व्यक्त केल्या.  यावेळी कोकणाला संधी मिळेल, या अपेक्षेवर कोकणातील अनेक इच्छूक होते.  आतापर्यंत डोंबिवली, ठाण्याला कोकणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. कोकण पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व डोंबिवलीचे वसंतराव पटर्वधन, डॉ. अशोक मोडक  आणि ठाण्याचे संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी केलेले आहे. 

आतापर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील कोणालाच संधी मिळालेली नाही. या मतदार संघामध्ये पहिल्या निवडणुकीत फक्त 6 हजार मतदार होते, तेव्हा भाजपकडून पटर्वधन हे पहिल्यांदा निवडून आले. आता मतदारांची संख्या 90 हजारांपर्यंत पोहचली आहे. पारंपारिक  मतदार कायम असतात, ही गैरसमज डावखरे यांच्या विजयाने दूर झाला आणि शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ठाणेकर असलेल्या डावखरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने कोकणातील भाजपमधील इच्छूकांमध्ये नाराजी पसरली आहे.

 शिवसेनेतर्फे ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते कामालाही लागले आहेत. खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक लावून चर्चा केली होती. भाजपला शह देण्यासाठी रत्नागिरीमधील माजी आमदाराच्या हाती शिवधनुष्य देण्याची ‘विनय’शील रणनिती आखली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा झालेला पराभव पाहता पुन्हा कोकणात ताठ मानेने संघटना उभारण्याठी सेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. तसे घडल्यास भाजप-शिवसेनेमधील लढत खर्‍याअर्थाने रंगेल.

 डावखरे हे पक्ष सोडून जाणार नाहीत, असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला शेवटपर्यंत वाटत राहिल्याने त्यांनी नव्या उमेदवाराचा शोध घेतला नाही. ऐनवेळी पक्षाला तगडा उमेदवार शोधण्याची गरज निर्माण झाली. ठाण्यातील माजी विरोधी पक्ष नेता आणि कोकण मर्चट बँकेचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. त्यांना उमेवदारी मिळाली तर  ठाण्यातील दोन आणि कोकणातील एक असे चित्र पाहायला मिळाले तर आश्‍चर्य वाटू नये.

माजी आमदार बाळ माने, माजी आमदार विनय नातू,  माजी आमदार प्रमोद जठार, चेतन पाटील आणि ठाण्यातील भाजपचे शहर अध्यक्ष संदिप लेले हे इच्छूक होते. या सर्वांना डावलण्यात आल्याने भाजपामधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सेनेकडून होत असल्याची चर्चा आहे.