Mon, Jul 13, 2020 11:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात?

कोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात?

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी

कोळीवाड्यांचा अंतर्भाव मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात करण्यात आलेला नसतानाच येथे अनेक ठिकाणी झोपडपट्टी घोषित करून त्या जमिनी बिल्डरांच्या घशात लोटण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप कोळी समाजाने केला आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) 2011 च्या नोटिफिकेशनमध्ये बदल करण्याची पावले उचलल्याने त्यावरूनही मुंबईसह राज्यातील समुद्रकिनारच्या कोळीवाड्यांमध्ये प्रचंड असंतोष व संतापाचे वातावरण आहे.  

मुंबईतील कोळीवाड्यांचा समावेश डीपीमध्ये करण्यात आलेला नसल्याने कोळी समाजात कमालीचा असंतोष आहे. त्यातच कोळीवाड्यांच्या हद्दीही निश्‍चित करण्यात आलेल्या नाहीत व त्या करण्याबाबत सरकारी पातळीवर टाळाटाळ केली जात आहे. तसेच कोळीवाड्यांशेजारी नागरिकांच्या अर्थाजनाशी संबंधित असलेल्या मासे सुकविण्याच्या रिकाम्या जागा मात्र अलीकडेच एका अधिनियमाद्वारे स्लम म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र स्लम एरियाज(इंप्रूव्हमेंट, क्‍लिअरन्स अ‍ॅण्ड रिडेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट, 1971 हा लागू करण्यात आला आहे. त्याला कोळीवाड्यांतील नागरिकांचा कमालीचा विरोध आहे. या माध्यमातून राज्य सरकारने बिल्डरांच्या घशात या जागा कोंबण्याचा उद्योग केला असल्याचा आरोप कोळीवाड्यांतून होत आहे. 

याबाबत नॅशनल फिशरवर्कर्स फोरमची (एनएफएफ) बुधवारी एक महत्त्वाची बैठक झाली असून त्यामध्ये राज्य- केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांनीच आपल्या जागांचा सर्व्हे करण्याची मागणी बहुसंख्य नागरिकांनी केली आहे. तसेच समुद्रकिनारी राहात असलेल्या नागरिकांनी सरकारच्या आठमुठ्या धोरणाच्या विरोधात राज्य व केंद्रीय स्तरावर आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

Tags : Mumbai, mumbai news, Koliwada place issue,