Sat, Mar 23, 2019 16:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोळीवाड्याची नोंद झोपडपट्टी  म्हणून केली

कोळीवाड्याची नोंद झोपडपट्टी  म्हणून केली

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:43AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

इंग्रज काळापूर्वीपासून स्वतःचे वेगळे अस्तित्व जपून असलेल्या कोळीवाड्यांची नोंद सरकारने आता गलिच्छवस्ती आणि झोपडपट्टी म्हणून केली आहे. यामुळे कोळीबांधवांमध्ये सरकारच्या या धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याविरोधात आज  मंगळवारी याविरोधात मूकमोर्चे काढले जाणार आहेत, अशी माहिती सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत वरळी कोळीवाडा ऑनर्स कम्युनिटी वेल्फेअर सहकारी संस्थेचे सचिव प्रल्हाद वरळीकर यांनी दिली. 

कोळीवाडयांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी येथे सरकारकडून एसआरए योजना आणली असून त्यासाठी येथील स्थानिकांना विश्वासात न घेताच काही विकासक जमिनी ताब्यात घेण्यासाठी पुढे आले असून त्याविरोधात उद्या मुंबईत वरळी आणि इतर सर्व कोळीवाड्यांमध्ये कँडल मार्च आणि मुकमोर्चा काढला जाणार आहे. तरी शेकडोच्या संख्येने कोळीबांधवांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन प्रल्हाद वरळीकर यांनी केले आहे. 
वरळी गावातील सर्व रस्त्यावर हा कँडल मार्च काढण्यात येणार आहे.

गावठाण म्हणून असलेल्या कोळीवाड्यांच्या अनेक जागा मुंबईची वेगळी ओळख असलेल्या आहेत, मुळात मुंबई बेट हे पूर्वाश्रमीच्या कोळी, भंडारी, व ईस्ट इंडियन समूहाचा आहे. त्यांचा विकास हा झोपडपट्टीच्या नावाने करणे आणि या सर्व वस्त्या गलिच्छ आहेत,  असे जाहीर करणे चुकीचे आहे. यासाठी सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोपही प्रल्हाद वरळीकर यांनी केला.