होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पडली बंद

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पडली बंद

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:10AMमुंबई : विशेष प्रतिनिधी  

कोल्हापूर — मुंबई विमानसेवा गेली तीन दिवसांपासून बंद असून एअर डेक्कन कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही विमानसेवा बंद झाल्याचे समोर आल्याने राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही कंपनी विमानसेवा चालविण्यास असर्थ आहे. त्यामुळे या कंपनीची सेवा बंद करून नव्या कंपनीमार्फत सेवा सुरू करावी असा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला देणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

तांत्रिक अडचण असल्याचे सांगून ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे नाशिक- पुणे, नाशिक-मुंबई आणि जळगाव-मुंबई या विमानसेवाही बंद करण्यात आल्या आहेत. 

एअर डेक्कन कंपनीने गेल्या तीन दिवसांपासून विमानसेवा बंद केली आहे. बर्‍याच प्रयत्न आणि प्रतीक्षेनंतर ही विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, या कंपनीच्या गलथान कारभारामुळे ती बंद झाली आहे. एअर डेक्कन कंपनीचे वैमानिक आणि कर्मचार्‍यांनी पगार मिळत नसल्याने असहकार पुकारला आहे. त्याचा फटका या विमानसेवेला बसला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

या कंपनीने कोल्हापूर — मुंबईच नव्हे तर नाशिक आणि नाशिक येथील विमानसेवाही बंद पाडल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या कंपनीची विमानसेवा बंद करावी आणि अन्य सक्षम कंपनीकडे ती सोपवावी, अशी मागणी राज्य सरकार करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार हे त्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.