Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वायुप्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर कन्येचा आगळा प्रकल्प!

वायुप्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर कन्येचा आगळा प्रकल्प!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

ट्रॅफिक सिग्नलवर लाल सिग्नल हिरवा होण्याची प्रतीक्षा करणारे वाहनचालक वाहन बंद न करता इंजिन सुरूच ठेवतात. त्यामुळे होणार्‍या वायूप्रदूषणाला रोखण्यासाठी शिवानी खोत व तिची बहिण ईशा यांनी एक आगळावेगळा मार्ग सुचवला आहे.  शिवानीच्या या प्रकल्पाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर वायुप्रदुषणाबरोबरच दररोजच्या कोट्यवधी रूपयांच्या इंधनाचा वायफळ खर्च वाचण्याची शक्यता आहे. शिवानी ही मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील रहिवासी आहे.

लाल, पिवळा व हिरवा या सध्याच्या 3 सिग्नलमध्ये निळा सिग्नल लावावा व निळा सिग्नल सुरू असताना वाहन बंद करणे बंधनकारक करावे, असा मार्ग त्यांनी सुचवला आहे. लाल सिग्नल सुरू झाल्यावर पाच सेकंदांनतर निळा सिग्नल सुरू करावा व हिरवा सिग्नल सुरू होण्यापूर्वी पाच सेकंदापूर्वी निळा सिग्नल बंद करावा असा उपाय या बहिणींनी सुचवला आहे.

दिल्ली येथील चित्कारा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय अन्वेषण विज्ञान संशोधन महोत्सवात शिवानीच्या या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले आहे. घाटकोपर येथील एस. के. सोमय्या महाविद्यालयात कला
शाखेत मानसशास्त्राचे शिक्षण घेणार्‍या शिवानीचे वडील दत्तात्रय खोत हे मुंबई पोलीस खात्यात सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांचे मार्गदर्शन व पाठिंबा या पूर्ण प्रवासात मिळाल्याची भावना शिवानीने व्यक्त केली. लाल सिग्नलवर हिरवा सिग्नल लागण्याची प्रतिक्षा करण्यामध्ये वाहनचालकांद्वारे वाहन सुरू  ठेवल्याने नेहमीपेक्षा 24 टक्के जास्त वायू प्रदूषण होते त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे याचा ध्यास शिवानीने घेतला होता. केवळ एकट्या दिल्लीमध्ये एका दिवसात सिग्नलवर वाहने सुरू ठेवल्याने तब्बल 24 कोटी रूपयांचे इंधन वाया जाते व काही टन कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो, असे केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या अहवालाच्या आधारे केलेल्या अभ्यासामध्ये समोर आले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल, यावर शिवानीचा विचार सुरू होता. त्यामधून हा पर्याय समोर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिग्नलवर वाहन थांबलेले असताना केवळ 20 टक्के वाहन चालक वाहनाचे इंजिन बंद करण्याची तसदी घेतात. उर्वरित तब्बल 80 टक्के वाहन चालक वाहन चालू ठेवतात. त्यामुळे विनाकारण वायूप्रदूषणामध्ये भर पडत असते. विदेशातून आयात केल्या जाणार्‍या इंधनाचा अशा प्रकारे गैरवापर होत असतो. त्यामुळे हे प्रकार रोखण्याची नितांत आवश्यकता आहे. याच भावनेतून हा विचार समोर आल्याचे शिवानी यांनी स्पष्ट केले. देशाच्या राजधानी दिल्लीतील केवळ आठ व्यस्त चौकामध्ये सिग्नलच्या काळात इंजिन बंद करण्यात आले तर 70 कोटी रूपयांचे इंधनाची बचत होईल. या 8 जंक्शनवर 28 हजार 750 टन कार्बन उत्सर्जित होतो. लाल सिग्नल असताना वाहने बंद केल्यास हे प्रदूषण बंद होईल. काही ठिकाणी सिग्नलशेजारी असलेल्या इंडिकेटरमध्ये सिग्नल लाल वरून हिरवा होण्यासाठी किती सेकंद लागतील याची माहिती दिलेली असते. मात्र त्यानंतरही वाहनचालकांच्या प्रवृत्तीमध्ये बदल होत नसल्याने त्याला कायद्याचे स्वरूप देऊन बंधनकारक करण्याची गरज शिवानी यांनी व्यक्त केली.

Tags : Traffic, Signal, Air Pollution, Save Fuel, Fuel, Gold Medal, 


  •