Wed, May 22, 2019 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकण रेल्वे होणार फास्ट!

कोकण रेल्वे होणार फास्ट!

Published On: Jan 22 2018 11:07AM | Last Updated: Jan 22 2018 11:07AMमुंबई : योगेश मुकादम

मुंबईला कोकण, गोवा, कर्नाटक राज्याशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी कोकण रेल्वे येत्या तीन वर्षांत अधिकच फास्ट होताना दिसणार आहे. नवी 21 क्रॉसिंग स्टेशन्स, संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण, कंटेनर वाहतुकीसाठी सुविधा केंद्र यामुळे आरामदायी प्रवासासोबतच रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी शुक्रवारी मडगाव येथील पत्रकार परिषदेत दिली. विकासकामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  

विद्युतीकरणासाठी 1100 कोटी रुपये, रोहा-वीर मार्ग दुपदरीकरण 410 कोटी, जयगड दिघी रेल्वे लाईन 771 कोटी, नव्या स्थानकांच्या उभारणीसाठी 202 कोटी रुपये, बाल्ली लॉजिस्टिक पार्क 43 कोटी एवढा खर्च अपेक्षित असून हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. 

शेअर रोखेद्वारे भांडवल उभे करून ही कामे करण्यात येणार असून यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा 51 टक्के, महाराष्ट्र सरकारचा 21टक्के, कर्नाटक सरकारचा 16 टक्के, गोवा आणि केरळ सरकारचा प्रत्येकी 6 टक्के वाटा असणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. तसेच बँका, वित्तीय संस्थांकडून लोन  घेऊन भांडवल उभे केले जाईल.  केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या अधिकृत शेअर समभाग (कर्जरोखे) भांडवलामध्ये 806.47 कोटी रुपयांवरून 4,000कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मागील काळात मंजुरी दिली होती. 2016-17 या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने तब्बल 62 कोटी निव्वळ नफा मिळवला. तर गतवर्षाची वार्षिक उलाढाल 2152 कोटी इतकी होती. 2013.14 च्या तुलनेत उलाढालीत 59 टक्क्यांनी वाढ झाली. ही प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेचा रूळ प्रगतीपथावर येऊ शकेल. 

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सोयी-सुविधा पुरवण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेसाठीही कटिबद्ध असून स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.तसेच बायो टॉयलेट, फुटओव्हर ब्रिज, प्रवाशांसाठी आश्रयस्थाने, शुद्ध पाण्याची व्यवस्था, एटीएम सेंटर, डिजीटल माहीती फलक, 29 स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा सुद्धा रेल्वेकडून पुरवण्यात येणार आहेत. यावेळी  कारवार विभागाचे महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान, मुख्य जनसंपर्क अधिकारी  एल.के वर्मा, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर उपस्थित होते.

आता ‘कोरे’ 87 स्थानकांची 

स पूर्वीच्या 66 स्थानकांमध्ये 21 नव्या स्थानकांची वाढ झाल्यामुळे कोकण रेल्वे आता 87 स्थानकांची होणार आहे. यापैकी इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कलंबानी, कडवई, वेरावल्ली, खारेपाटण, अर्चिन ही स्थानके महाराष्ट्रातील आहेत. कर्नाटक उडिपीतील इन्नंजे स्थानकाचे काम 11 कोटी 24 लाख रुपये खर्चून सध्या सुरू आहे. नवी स्थानके तयार झाल्यानंतर  स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकेल.

गोवा-जेएनपीटी कंटेनर वाहतूक

स बाल्ली लॉजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत कोकण रेल्वेने केलेल्या करारानुसार देशी-विदेशी कंटेनर वाहतूक होणार आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न कोकण रेल्वेस मिळू शकेल. तसेच कंटेनर वाहतुकीसाठी येणारा मुंबई-गोवा महामार्गावरील ताणही कमी होणार आहे. 81 हजार 300 चौरस मीटर क्षेत्रात हा प्रकल्प आकार घेत आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी व्यक्त केला.  पार्कच्या ठिकाणीच कस्टम किलअरन्सची सोय देखील करण्यात येणार आहे.

विद्युतीकरणामुळे इंधनाची बचत 

स इंधनाची बचत करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार संपूर्ण कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेचा धुरांच्या रेषा इतिहासजमा होणार आहेत. रोहा ते ठोकूर या 741 किमी मार्गाचे काम दोन टप्प्यात एल.अ‍ॅण्ड टी., कल्पतरू कंपनीकडून होणार आहे. यामुळे डिझेलवरील खर्चात तब्बल वर्षभरात 100 कोटींची बचत होणार आहे.  इंधनासाठी आता 250 ते 300 कोटी एवढा खर्च होतो. 

दुपदरीकरणामुळे वेग वाढणार!

स कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्यामुळे क्रॉसिंगसाठी बराच वेळ जातो. अनेकदा गाड्या आऊटिंगला थांबवल्या जातात. एखादा किरकोळ अपघात झाला तरी वाहतूक सुरळीत व्हायला तासन्तास वाट पाहावी लागते. दुपदरीकरणामुळे रेल्वेचा वेग निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे वेळेवर इच्छितस्थळी पोहोचणे प्रवाशांना शक्य होऊ शकेल.