Wed, Apr 24, 2019 07:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मुख्यमंत्री, शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने पाठविण्याची चूक करु नका’ 

‘मुख्यमंत्री, शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने पाठविण्याची चूक करु नका’ 

Published On: Mar 12 2018 1:29PM | Last Updated: Mar 12 2018 1:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अखिल भारतीय किसान मोर्चेतील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधी पक्ष देखील रस्त्यावर उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांनी मोर्चात सहभागी होत सरकारवर हल्ला चढवला. 

मायबाप शेतकऱ्याला रिकाम्या हाताने पाठवू नका- सुप्रिया सुळे

शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाला कुठल्याही राजकारणाचा वास नसतो. शेतकरी न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानात आलाय. त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका, असे सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्याच्या पायाला आलेले फोड आणि रक्त त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगायला पुरेसे आहेत. शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर त्यांना रांगेत उभे केले. गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली तर हातात गुन्हेगारांसारख्या पाट्या दिल्या. आता शेतकरी त्याच्या हक्कांसाठी मुंबईत आलाय. त्याला रिकाम्या हाताने पाठविण्याची चूक करु नका, तो तुम्हाला माफ करणार नाही, असे देखील सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून सरकारला सुनावले. 

चर्चा करायची होती तर नाशिकमध्ये का केली नाही?: अजित पवार

शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यावर चर्चा करण्यास सरकार आज तयार झाले आहे. ही चर्चा नाशिकमध्येच केली असती तर एवढी पायपीट शेतकऱ्यांना करावी लागली नसती, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला फटकारले. सरकारने नाशिकमध्ये चर्चा केली असती तर अनेक शेतकऱ्यांच्या पायाला जखमा झाल्या नसत्या. 

मुख्यमंत्र्यांना धडकी भरली- धनंजय मुंडे

कर्जमाफीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीला जीवाणू समिती म्हणून हिणवले होते. त्याच मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा आजचा मोर्चा बघून धडकी भरल्याचे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.  

मुक्या-बहिऱ्या-आंधळ्यांचे सरकार- तटकरे 

एवढा लांब पल्ल्याचा प्रवास करून हे शेतकरी आपला आवाज या मुक्या-बहिऱ्या-आंधळ्या सरकारपर्यंत पोहोचवण्यास आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आल्यानंतर किसान सभेची जी भूमिका आहे त्याला आमचा पाठिंबा असेल, असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.