होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या राजाचे दर्शन यंदा सूर्यमंदिरातून!

मुंबईच्या राजाचे दर्शन यंदा सूर्यमंदिरातून!

Published On: Sep 02 2018 1:53AM | Last Updated: Sep 02 2018 1:32AMपरळ : प्रतिनिधी

गणेशोत्सवात यंदा आपल्याला गणेश गल्‍लीतील ‘मुंबईच्या राजा’चे दर्शन चक्‍क सूर्यमंदिरात जाऊन घेता येणार आहे.  ग्वाल्हेरच्या सूर्यमंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली 100 कारागिरांची टीम महिनाभरापासून मेहनत घेत आहे. लालबागचा सर्वात जुना आणि मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या गणेशोत्सवाचे यंदाचे 91 वे वर्ष आहे. 

देशातील विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन मंडळाकडून दरवर्षी घडवण्यात येते. नयनरम्य मंडप उभारणी, आकर्षक रोषणाई, डोळे दीपवणारी मूर्तीची भव्यता आणि मनोहारी देखावे असे या बाप्पाचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. यंदा मुंबईचा राजा अश्वमेधावर आरुढ होणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे.

1918 मध्ये गणेश गल्लीच्या गणरायाची स्थापना झाली.  9 दशकांतल्या उत्कृष्ट आयोजनामुळेच गणेश गल्लीचा गणपती हा ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळखला जातो. लालबागमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाचे दर्शनासाठी पावले गणेश गल्‍लीत वळतातच. 

गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये दररोज किमान लाखभर भाविक दर्शनासाठी येतात. 24 तास दर्शन सुरूच असते. सायंकाळनंतर गर्दी वाढते. रात्री तर गर्दीचे सर्व उच्चांक मोडतात, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली. बाप्पांचा मुख्य गाभारा आणि मंदिरातली व्यवस्था पाहण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांच्या टीम्स मंडळाने तयार केल्या आहेत. दररोजच्या आरतीचा मान  पोलीस, सफाई कर्मचारी, नर्सेस,दूध विक्रेते, फायरब्रिगेडचे कर्मचारी, सामाजिक संस्था यांना देण्याची मंडळाची परंपरा आहे. याचे नियोजन गणेशोत्सवाच्या आधीच केले जाते.