Wed, Jul 17, 2019 18:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किकी चॅलेंज : ग्लोबल सिटीतील 3 तरुणांना रेल्वे पोलिसांकडून अटक

किकी चॅलेंज : ग्लोबल सिटीतील 3 तरुणांना रेल्वे पोलिसांकडून अटक

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:43AMविरार : वार्ताहर

विरार रेल्वेस्थानकात मंगळवारी किकी चॅलेज करणार्‍या 20 ते  25 वयोगटांतील तीन तरुणांना चांगलेच महागात पडले. त्यांच्यावर रेल्वे पोलिसांनी अटकेची कारवाई केली. निशांत शहा, धृव शाह आणि शाम शर्मा अशी त्यांची नावे आहेत. 

सध्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर किकी चॅलेंजचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. यात तरुण आपले जीव धोक्यात घालून चालत्या गाडीतून उतरून रस्त्यावर डान्स करतात. अनेकांनी गाण्याच्या चालीवर चाल धरत हे चॅलेंज स्वीकारले. मात्र, यामुळे जीव जाऊ लागल्याने आता देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोलिसांनी हे चॅलेंज स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.

रस्त्यावर चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण  केल्यानंतर आता रेल्वेमध्येही हे जीवघेणे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी बेलगाम तरुणाई नृत्य करत आहे. मंगळवारी विरार रेल्वेस्थानकात किकी चॅलेंज करणार्‍या तरुणासह त्याच्या दोन साथीदारांवर विरार रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. ते तिघे विरार रेल्वेस्थानकाच्या 1 नंबर फलाटावरून निघालेल्या धावत्या ट्रेनमध्ये चॅलेंज करत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विरार रेल्वे पोलिसांनी कारवाई करून त्या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना समज दिल्यानंतर सोडण्यात आले. किकी चॅलेंज करून अपघाताला आमंत्रण देऊ नका, असे आवाहन विरार रेल्वे पोलीस अधिकारी गोरख मल्ल यांनी केले.