होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण 

सतरा वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण 

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

तीन दिवसांपूर्वी इस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 20 वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आदित्य जगदीशचंद्र गुप्ता असे या 20 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव असून तो 2007 सालच्या इंडियाज गॉट टॅलेंटचा स्पर्धेक असल्याचे समोर येत आहेे. 

आदित्य गुप्ताचा ताबा रात्री उशिरा डी. एन. नगर पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. पीडित सतरा वर्षांची मुलगी अंधेरी परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वीच तिची इस्टाग्रामवर आदित्यसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी ती रविवारी अंधेरी येथे आली होती. या दोघांची भेट झाली आणि त्याने तिला नालासोपारा येथे आणले. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. 

मुलगी घरातून निघून गेली आणि रात्री उशिरापर्यंत न आल्याने तिच्या पालकांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा समातर तपास गुन्हे शाखेचे वांद्रे युनिटचे अधिकारी करीत होते. सोमवारी ही मुलगी अंधेरीतील मॅकडोनाल्ड रेस्ट्रॉरंटवर अत्यंत वाईट परिस्थितीत पोलिसांना सापडली.  तिला नंतर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात तिच्यावर  अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.  चौकशीत तिने आदित्य गुप्ता याचे नाव सांगितले होते. गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने नालासोपारा येथून आदित्य गुप्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.