Sun, Jul 21, 2019 08:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर भुजबळांसोबत एकत्र येणार : एकनाथ खडसे

...तर भुजबळांसोबत एकत्र येणार : एकनाथ खडसे

Published On: Jun 16 2018 1:40AM | Last Updated: Jun 16 2018 7:33AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार हा जूनअखेरीस होणार आहे. मुख्यमंत्री परदेश दौर्‍यावरुन शनिवारी परत येत असून ते थेट दिल्लीत जाणार असल्याचे समजते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर एकनाथ खडसे हे दिल्लीत आहेत. त्यांनी थेट दिल्लीतून नाराजी प्रकट करतानाच ओबीसी कार्ड दाखवत थेट छगन भुजबळ यांच्याशी हातमिळवणी करण्याची धमकीच एक प्रकारे भाजपला दिली.  खडसे हे जनाधार असलेले नेते असून त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार का, याकडे महाराष्ट्राचे खास लक्ष लागले आहे

राज्यातल्या ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असून ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव आहे अशी खदखद माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी बोलून दाखविली. ओबीसींच्या प्रश्‍नावर पक्षभेद आणि राजकारण बाजूला ठेवून छगन भुजबळ यांच्यासोबत एकत्र येऊ, असेही खडसे म्हणाले. आपल्या बदनामीचा कट अंजली दमानिया यांच्याशी संगनमत करुन मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने रचल्याचा आरोपही त्यांनी केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. 

राज्यात ओबीसी नेतृत्व अडचणीत आले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींसाठी सतत संघर्ष केला. आपणही मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसींच्या प्रश्‍नावर लढलो. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. छगन भुजबळही ओबीसींसाठी लढत आले आहेत. ओबीसींच्या प्रश्‍नावर आज एकत्र येण्याची गरज आहे. ओबीसींच्या प्रश्‍नावर आपण राजकारण आणि पक्ष बाजूला ठेवून भुजबळांसोबत एकत्र येण्याची तयारी आहे, असे खडसे म्हणाले. 

गेली 40 वर्षे आपण पक्षासाठी झिजलो, खस्ता खाल्ल्या, कधी पदाची अपेक्षा बाळगली नाही. माझ्यावर खोटेनाटे आरोप झाल्यावर माझ्याविरुध्द चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. दोन वर्षे अपमानास्पद वागणूक मिळाली. राज्य सरकारमधील मंत्र्यानेच कटकारस्थान रचत मला बदनाम केले. अंजली दमानिया यांच्याशी संगनमत करून बदनामीची मोहीम राबविण्यात आली, असे खडसे म्हणाले. बदनामी होऊन मंत्रिमंडळातून जावे लागले याबद्दल खडसे यांनी खंतही बोलून दाखविली. मला मंत्रिमंडळात घेतले तर ठीक, नाहीतर त्याचे काही वाटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दमानिया यांच्याविरुध्द मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपण निवेदन दिले आहे. दमानिया यांच्यावर आता कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

नाथाभाऊ पक्षाचे नुकसान करणार नाहीत : मुनगंटीवार 

एकनाथ खडसे यांनी भाजपला वाढवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आहेत. त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत.  त्यामुळे ते पक्ष कधीच सोडणार नाहीत. त्यांच्यासाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ.. इसके सिवा जाना कहाँ अशीच स्थिती असल्याची प्रतिक्रीया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा गैरलागू आहे. खडसे यांनी नाराजी असेल तर ती पक्ष दूर करेल. पक्षाला नुकसान होईल असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले.