Sat, Dec 14, 2019 02:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)

मुंबई : डोंगरीत म्हाडा इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा १४ वर (video)

Published On: Jul 17 2019 8:06AM | Last Updated: Jul 17 2019 10:39AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई नावाची चार मजली अवैध इमारत काल, मंगळवारी (दि.१६) कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. सरकारकडून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत, तसेच सर्व वैद्यकीय खर्च देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

साबिया निसार शेख (वय २५), अब्दुल सत्तार कालू शेख (वय ५५), मुजमिल मन्सूर सलमानी ( वय १५), सायरा रेहान शेख (वय २५), जावेद इस्माईल (३४), अरहान शेहजाद (४०), कश्यप अमिरजान (१३), साना सलमानी (२५), झुबेर मन्सूर सलमानी (२०), इब्राहिम (दीड वर्ष) , अरबाज (७), शहजाद (८), यामिन मन्सूरी (५४) अशी मृताची नावे आहेत. तर फिरोज नाझिर सलमानी (वय ४५), आयशा शेख (३), सलमा अब्दुल सत्तार शेख (५५), अब्दुल रेहमान (३), नावेद सलमानी (३५), इम्रान हुसेन कलवानिया (३०), जाविद (३०), जीनत (२५), अलमा मोहम्मद रशिद इद्रिशी (२८) अशी जखमींची नावे आहेत.

इमारत कोसळून मंगळवारी दहा नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला, तर आठ रहिवासी जखमी झाले होते. एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आज बचावकार्यादरम्यान आणखी चौघांचे मृतदेह सापडले. 

वाचा : 'बीएमसीला पैसे गिळून वेळ मिळाला तरच लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल'!(video)

मुंबईत काल, मंगळवारी पावसाच्या सरी सुरू असताना डोगंगरी परीसरात अचानक मोठा आवाज झाला. सुरुवातीला पत्रा पडल्याचे स्थानिकांना वाटले. मात्र केसरबाई इमारतीच्या चिंचोळ्या गल्लीतून काही जखमी लोक इमारत कोसळल्याची आरडाओरड करत या गल्लीनजीक असलेल्या दर्ग्याजवळ मदतीची मागणी करत धावून आले.

वाचा : क्षणात होत्याचे नव्हते झाले !

वाचा : डोंगरी येथील कोसळलेली इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही : म्हाडा 

केसरबाई इमारत पडली ती जागा अत्यंत अरुंद गल्लीत होती आणि तिच्या सभोवताली अनेक उंच इमारतींची गर्दी असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जेसीबी मशिन तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. इमारत चिंचोळ्या गल्लीत असल्याने रेस्क्यू व्हॅन, अ‍ॅम्ब्युलन्स, जेसीबी तसेच पोकलेन चिंचोळ्या गल्लीत नेणे शक्य नसल्याने मदतकार्यात मोठा अडसर निर्माण होत आहे. दुर्घटनेपासून जवळपास 100 मीटर अंतरावर अ‍ॅम्ब्युलन्स, रेस्क्यू व्हॅन तसेच पोलिसांचे पथक ठेवण्यात आले आहे.