Tue, Apr 23, 2019 10:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातून राज्यसभेवर

भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातून राज्यसभेवर

Published On: Mar 12 2018 1:35AM | Last Updated: Mar 12 2018 1:27AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि एनडीएतील घटक पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यानंतर भाजपकडून राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कोण असेल, याबाबतची उत्कंठता संपली आहे.भाजपने महाराष्ट्रातून केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून तीन खासदार जाणार आहेत. यापैकी जावडेकर आणि राणे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर तिसर्‍या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत होते. पुणे एमआयडीसी भूखंड खरेदीप्रकरणाच्या ठपक्यामुळे खडसे सध्या मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, यासाठी प्रयत्न करून थकल्यानंतर खडसे यांनी आता सरकारवरच आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. 

वर्षअखेरीस लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या वावड्या उडविल्या जात असल्यामुळे ते विरोधकांच्या तंबूत जाऊ नयेत, यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न करता राज्यसभेवर पाठविले जाईल, असे बोलले जात होते; पण मुरलीधरन यांचे नाव जाहीर करून भाजपने खडसे यांचा दिल्लीत येण्याचा मागील दरवाजाही बंद केला आहे.