Sat, Apr 20, 2019 10:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : कपाळकरट्यांनो ! तुम्हाला या रक्ताळलेल्या फोडांचा हिशोब द्यावा लागेल !

ब्लॉग : कपाळकरट्यांनो ! तुम्हाला या रक्ताळलेल्या फोडांचा हिशोब द्यावा लागेल !

Published On: Mar 13 2018 2:34PM | Last Updated: Mar 14 2018 1:19AMदत्तकुमार खंडागळे

 मुंबई : पुढारी ऑनलाईन

किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. या लाँग मार्चवरून राज्यात राजकारणाचे फड रंगले. जमलेल्या गर्दीवर आपली शेकून घेण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि विशेष म्हणजे शिवसेनेनेही आपली शेकून घेण्याचा प्रयत्न केला. फक्त भाजपाच तेवढा या लाँग मार्चला पाठींबा द्यायचा उरला होता. शिवसेना एका बाजूने सत्तेचाही फायदा उठवते आणि दुसऱ्या  बाजूने विरोधाचे ढोंगही वठवते आहे. ही दुटप्पी भूमिका नेहमीचीच झाली आहे. किसान सभेच्या लाँग मार्च वरून राज्यात बरेच वातावरण तापले. भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांनी सदर मोर्च्यात माओवादी असल्याचे घोषित केले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदर मोर्च्यातले ९५ टक्के लोक शेतकरीच नसल्याचे सांगितले. 

संघ आणि परिवारातल्या लोकांना मोर्च्यात असलेल्या लाल झेंड्याचे पित्त उसळले होते. इतक्या मोठ्या स्वरूपातले लाल झेंडे पाहून त्यांना पोटशुळ उठला होता. परिवारातले अनेक लोक लाल झेंडा कसा रक्तरंजीत व अत्याचारी आहे हे पटवून देण्यात व्यस्त होता. त्यांचा रक्ताळेला इतिहास मांडण्यात ही सगळी जमात व्यस्त होती. हे मांडताना या मंडळींना हे भान नव्हते की क्रांतिसिह नाना पाटील, शहीद भगतसिंग व नेताजी सुभाष बाबू या लाल बावट्याचे समर्थक होते. म्हणजे नेताजी, क्रांतिसिंह व भगतसिंगही नक्षलवादीच होते काय ? ही मंडळी अशा अविर्भावात लिहीत होती की संघ परिवार म्हणजे अहिंसावादी तत्वद्नानाचा खंदा पुरस्कर्ता आहे. बुध्दांच्या व गांधींच्या तत्वद्नानाचे पाईक असल्यासारखे हे लोक त्यांच्या रक्तरंजीतपणाची वर्णने लोकांच्यापुढे मांडत होते. संघ परिवाराचा भुतकाळ व छुपा चेहरा नव्या पिढीला माहीत नसेल. पण इतिहासात त्याची नोंद आहे. एकूण या मोर्च्याच्या निमित्ताने ज्याला जशी खाज होईल तसे खाजवताना दिसत होते. आप-आपल्या पोळ्या कशा शेकता येतील ? याचा विचार करत होते. काही संघ परिवारातल्याच प्रवृत्ती आडोश्याने शेतकरी कसा फुकटा आहे, करबुडवा आहे असे सांगून शेतकरी व त्यांच्या मोर्च्याबाबत समाजात असणारी सहानुभूती संपवण्याचा प्रयत्न करत होती.

गेल्या तीन वर्षात जे जे लोक आंदोलनाला उतरले ते ते कसे नालायक आहेत किंवा काँग्रेस धार्जिणे आहेत असे बिंबवण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. या देशात यापुर्वी खुप मोठ-मोठी आंदोलने झाली. सरकार विरोधी रोष व्यक्त झाला. पण त्या रोषाला, त्या आंदोलणांना व आंदोलकांना नालायक ठरवण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. या सरकारची आयटी सेल मधील पाळीव व पगारी पिलावळ हे काम निष्ठेने करताना दिसते आहे. तसेच फडणवीसांचे झाडून सारे जातभाई असल्या उचापतीत बायका-मुलांसह उतरल्याचे प्रकर्षाने दिसते आहे. यापुर्वी ही जातभाईंची टिम कुठल्याच सरकारच्या समर्थनासाठी आणि इतरांच्या विरोधात कधीच उतरलेली दिसली नव्हती. अगदी अटलजी पंतप्रधान असताना किंवा मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाही जातभाईंची टिम कार्यरत नव्हती. स्वातंत्र्यापासून कधीच सत्तेला जातीचा वास आला नव्हता. देशाचे अनेक प्रधानमंत्री ब्राम्हण होवून गेले पण त्यांच्या सत्तेला कधी जातीचा वास आला नाही किंवा निव्वळ जातवाले सरकारच्या समर्थनार्थ बाहेर आले नव्हते. महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टिकेची झोड उठवली गेली पण मराठा म्हणून कुठले मराठे त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचे दिसले नव्हते. सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावरही खूप टिका झाली. पण त्यांचे जातभाई कधी समर्थनासाठी पुढे सरसावल्याचे दिसले नाहीत. देशाच्या इतिहासात कधीच असे दिसले नव्हते. सध्या ते जाणीवपूर्वक लक्षात येते आहे. फडणवीसांच्या धोरणात्मक नालायकीवर लिहीले किंवा बोलले तर फडणवीस ब्राम्हण आहेत म्हणून विरोध केला जातो असा जावईशोध लावला जात आहे. 

सोशल मिडीयातील पाळीव पिलावळ हे काम निष्ठेने करत आहेत. एकूणच महाराष्ट्रातल्या अनेक व्यापक परंपरांना संपवत संकुचित राजकारण टोकदार केले जात आहे. राजकारणात संकुचित विकृतीला जोपासले जात आहे. फडणवीसांच्या सरकारी धोरणाला विरोध म्हणजे जातीला विरोध हा नवा शोध लावला गेला आहे. खरेतर फडणवीस समर्थकांच्या मस्तकातली ही घाणच खरा जातीयवाद आहे. या लोकांना फडणवीसांचीच सत्ता आपलीशी वाटण्या मागची कारणं काय ? त्यांची ही मानसिकता काय सांगून जाते ? याचा विचार करावा लागेल. 

किसान लाँग मार्चच्या निमित्ताने अशा अनेक घटना घडताना दिसत होत्या. या सगळ्या गदारोळात मुळ प्रश्न बाजूला पडताना दिसत होते. मुळातच हा मोर्चा सुरू झाल्यावर माध्यमांनीही त्याकडे कानाडोळा केला होता. अनेक फालतू गोष्टींना दाखवणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमं या मोर्च्याला जागा द्यायला तयार नव्हती. पण सोशल मिडीयातून जश-जशी मोच्याची  चर्चा वाढू लागली. मीडियाला शिव्या द्यायला सुरूवात झाली तेव्हा ही माध्यमं जागी झाली. मुंबईकडे चालत जाणाऱ्या हजारोंच्या गर्दीचे फोटो सोशल मीडियातून फिरू लागले तेव्हा यांचे कॅमेरे मोर्च्याकडे वळले. तोवर या माध्यमातील या लोकांची नालायकी लोकांच्या लक्षात आली होती. लाँग मार्चच्या निमित्ताने राजकारणाचे अनेक पदर उलगडले गेले. अनेकांच्या मनातील सुप्त विकृती समोर आल्या. 

 या मोर्च्यात अनेक महिला-मुले सामिल झाली होती. तब्बल २०० किलोमीटर पायपीट करणारा शेतकरी वंचीत आहे. तो सरकारच्या धोरणाचा बळी आहे. तो या व्यवस्थेने पिचलेला शोषित आहे. इथल्या प्रत्येक सत्तेचा वामन त्याच्याच डोक्यावर पाय देवून उभा राहिला. त्याच्या सत्तेच्या खुर्चीखाली त्याने या बळीराजाला गाडले. लाँग मार्चमधील शेतकऱ्यांचे पायपीट करून पाय रक्ताळले होते. त्याच्या पायांना फोड आले होते. अनेक वयस्कर महिला-पुरूष न्याय मिळवण्यासाठी रक्ताळलेल्या पावलांनी शासनाच्या दारात येत होते. पायातून रक्ताचे थेंब सांडत त्यांची पायपीट सुरू होती. शेतकऱ्यांच्या पायातून वाहिलेले रक्त उद्याच्या क्रांतीचा वणवा पेटवल्या शिवाय राहणार नाही. त्या वणव्यात इथली मस्तवाल सत्ता उलथी-पालथी झाल्या शिवाय राहणार नाही.  शेतकरी माय-भगिणींचे रक्ताळलेले पाय व त्या पायावरच्या फोडांना पाहून काळजात कळ येत होती. डोळ्याच्या कडा आपोआप ओलावल्या जात होत्या. सत्तेतल्या कपाळ करंट्यांनो, तुम्हाला या रक्ताळलेल्या फोडांचा हिशोब द्यावा लागेल ! 

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. त्याला न्याय हवाय. त्याला त्याच्या हक्काचे हवे आहे. त्याला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाही. त्याला कुणाच्या दयेची भिक नको आहे. त्याला कर्ज माफीचीही गरज नाही. आजवर त्याला जेवढा लुटला त्याचा हिशोब चुकता करा. त्याला पुर्णवेळ वीज, त्याच्या शेतीला पाणी, चांगले रस्ते द्या. त्याला त्याच्या मालाचे, त्याच्या कष्टाचे मुल्य स्वत: ठरवू द्या. शेतकरी सरकारला करही भरेल पण त्याला इतर उद्योजकाप्रमाणे मोजा. जीवनावश्यक कायद्यातून त्याचा माल वगळा. ऐंशी रूपयेचे पेट्रोल गपगुमाण घेणार्यांनो, वीस रूपये किलोचा कांदा पन्नास वर गेला की, कांद्याचे भाव गगनाला गेले म्हणून बोंबा मारण्याचे बंद करा. भाजीच्या पेंढ्या दहाच रूपयेला पाहिजेत ही दळभद्री मानसिकता सोडून द्या. शेतकर्यांचा माल फुकटात घ्यायची प्रवृत्ती सोडून द्या. 

महाविद्यालयात पंचेचाळीस मिनिटं शिकविणाऱ्या प्राध्यापकांना तेवढ्या वेळेसाठी ३००० रूपये दिले जातात. शेतकरी शेतात दिवस-रात्र राबतो. त्याच्या त्या वेळेचेही मूल्य ठरवा. त्याला गरज नाही तुमच्या कर्जमाफीच्या तुकड्यांची. तो स्वत:च सक्षम होईल. शेतकर्यांचे दारिद्र्य इथल्या समाजाच्या दळभद्री मानसिकतेत आहे. शेतकरी सक्षम व्हावा, असे कुणालाच वाटत नाही. तो राजकारणासाठी कच्चे भांडवल म्हणून प्रत्येक पक्षाला हवा आहे. याबाबतीत कुणी सुतळाक नाहीत. शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला मागची सरकारं व त्यांची धोरणं जास्त जबाबदार आहेत. लाँग मार्चला पाठिंबा दिला म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपल्या पापातून मुक्त होत नाहीत. शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनीही नमकहरामी केली आहे. सध्याचे कपाळकरंटे आहेतच पण गत सरकारं आणि ते चालवणारे नमकहराम आहेत हे विसरता येणार नाही. आज देशोधडीला लागलेला शेतकरी केवळ तीन वर्षात लागलेला नाही. स्वातंत्र्यापासून त्याची वाट लावण्यात आली आहे. ही नालायकी या सर्वांनी मिळून केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले काय अन भाजपावाले काय सगळेच वामनाच्या औलादीसारखे शेतकऱ्यांशी वागले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरायचा नैतिक हक्क राज्यातल्या विरोधकांना नाही. याचे भान त्यांना ठेवावे लागेल.