Mon, Apr 22, 2019 04:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सामाजिक सौहार्द अबाधित ठेवा!

सामाजिक सौहार्द अबाधित ठेवा!

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:13PMमुंबई : खास प्रतिनिधी

महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल कामगिरी करत असताना आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे असून त्यासाठी सामाजिक सौहार्द अबाधित ठेवा, असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात  मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यानंतर ते बोलत होते.

स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करत असलेले जवान आणि बळीराजालाही अभिवादन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्र विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सातत्याने अग्रेसर कामगिरी करत आहे. महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण करत आहोत. पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केली असून विशेषत: पाऊस नसतानाच्या काळात पिकांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढली आहे, असे त्यांनी सांगीतले. 

उत्पादकता वाढत असतानाच शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात़ वाढ केली आहे. तसेच राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या भल्यासाठी गेल्या 3 वर्षात 8 हजार कोटी रुपयांची अन्नधान्याची खरेदी केली आहे. व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) धोरणामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून संघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले. 

छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे नेत असताना राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील रहाण्याची, तसेच सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्याची गरज प्रतिपादित करताना जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.