Tue, Apr 23, 2019 20:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्तींच्या बंदोबस्तासाठी कर्नाटकची मदत 

हत्तींच्या बंदोबस्तासाठी कर्नाटकची मदत 

Published On: Mar 17 2018 1:43AM | Last Updated: Mar 17 2018 1:34AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भूदरगड, राधानगरी, गगनाबावडा, चंदगड आदी तालुक्यांमध्ये हत्ती आणि रानगव्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे मान्य करतानाच या हत्तींना हुसकावून लावण्यासाठी राज्य सरकार कर्नाटकची मदत घेईल. तेथील प्रशिक्षीत माहुतांची टीम मे ते जून या कालावधी उपलब्ध होणार आहे, अशी माहीती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जंगली प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान पहाता प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर आणि संध्यादेवी कुपेकर यांचा समावेश असलेली अभ्यास समितीही नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. 

कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती व रानगव्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या भागात हत्तींची वाढती संख्या आणि त्यावर वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, सुमन पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. उपाय म्हणून राज्य सरकारने कर्नाटकची मदत घेण्याचे ठरविले आहे. .मात्र, सध्या कर्नाटकमध्ये देखील हत्तींचा धुडगूस सुरू असल्याने तेथील हत्ती हुसकावणार्‍या सर्व टीम व्यस्त आहेत. त्यामुळे कर्नाटककडून मे ते जून महिन्यांत मदत मिळणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

मात्र, आमदार प्रकाश अबिटकर यांनी या उत्तरावर आक्षेप घेतला. राज्य सरकार हत्तींना हुसकावून लावण्यासाठी कर्नाटकची वाट का पहात आहे. सरकार स्वत:चा टास्कफोर्स तयार का करीत नाही. गेली काही वर्षापासून सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि रानगव्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी आणि स्थानिकांना त्रास होत आहे. हत्तींमुळे मनुष्यहानी देखील होत असताना सरकारने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर देताना मुनगंटीवार यांनी प्रकाश आबिटकर, संध्यादेवी कुपेकर यांची समिती नेमण्याची घोषणा करतानाच ही समिती जो अहवाल देईल त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. जंगली प्राण्यांमुळे होणार्‍या नुकसान भरपाईत आता शेतातील नांगर, बैलगाडी, पाण्याचा पाईप, शेतातील टाकीचाही समावेश करण्यात येणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. शेतकर्‍यांना पीके व शेती अवजारांची नुकसान भरपाई ही 26 दिवसात दिली पाहीजे अशा सुचना दिल्या जातील, असेही सांगितले.

मुनगंटीवार यांची राजकीय टोलेबाजी  

जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात वटवागळांमुळे द्राक्षाच्या पिकांचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावर हत्‍ती आणि वटवागळे एकत्र यऊन नुकसान करणार नाहीत म्हणून प्रयत्न करू. तसेच हत्‍तीमुळे आपल्या राज्यातच नाही तर उत्‍तरप्रदेशमध्येही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर दिलीप वळसे-पाटील यांनी आता हत्‍तींनंतर वाघांची देखील काळजी घ्या, असे मुनगंटीवार यांना सांगितले. तेव्हा आम्ही वाघांच्या संरक्षणाची चोख काळजी घेत आहोत, असे त्यांना सांगितले. 

Tags : mumbai, mumbai news, elephant, settlement, Karnataka help,