होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्न करण्यासाठी केअरटेकरने केली वृद्ध दाम्पत्याची हत्या

लग्न करण्यासाठी केअरटेकरने केली वृद्ध दाम्पत्याची हत्या

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:46AMमुंबई ः प्रतिनिधी

खार येथील वयोवृद्ध नानक गोपालदास मखिजानी (86) आणि दया नानक मखिजानी (84) यांच्या हत्येतील आरोपी केअरटेकर पार्वती किशोर खाका आणि तिचा प्रियकर सिंधासन मुकूद एक्का या दोघांना शुक्रवारी दुपारी खार पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. दरम्यान, सिंधासन मुकूंद एक्का हा ओरिसा राज्य आर्म्स पोलीस दलातील निलंबित कर्मचारी असून त्याच्यावर त्याच्या गरोदर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचे महिला केअरटेकर पार्वती किशोर खाका हिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झालेे. तिच्यासोबत लग्न आणि घर घेण्यासाठी त्यांनी हा कट रचून दुहेरी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

पार्वती ही ओरिसाच्या सुंदरगड, लेफरीपाडा तर सिंधासन हा सुंदरगडच्या किंजीरकेला तालुक्याचा रहिवाशी आहे. सिंधासन हा तेथील आर्म्स पोलीस दलात कामाला होता. दरम्यान, त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्यात शारीरिक संबंध आले, त्यातून तरुणी गरोदर राहिली होती. तिच्याशी त्याला लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी त्याने तिची हत्या केली आणि पळून गेला. याप्रकरणी किंजीरकेला पोलीस ठाण्यात हत्येसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याला  किंजीरकेला पोलिसांनी अटक केली. 
जवळपास अडीच वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याला अलीकडेच जामिन मंजूर झाला होता. दरम्यान त्याचे पार्वतीसोबत प्रेमसंबंध निर्माण झालेे, या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नासह घर घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

पार्वती ही मखिजानी यांच्याकडे केअरटेकर म्हणून रुजू झाली. त्यांचे दोन्ही मुले अमेरिका आणि सिंगापूर येथे नोकरीनिमित्त राहत होते. घरातील इतर तिन्ही नोकर कामानंतर घरी जात होते. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. कपाटातील लाखो रुपयांचे दागिने आणि कॅश तिच्या निदर्शनास आले. ही माहिती तिने सिंधासनला दिली आणि या दोघांच्या हत्येची योजना बनविली. ठरल्याप्रमाणे 20 जूनला रात्री आठ वाजता सिंधासन हा ओरिसा येथून थेट खार परिसरात आला.  रात्री या दोघांनी संगमनम करुन नानक आणि दया मखिजानी यांचे हातपाय बांधून ओढणीने दोघांची हत्या करुन कपाटातील मिळेल ते दागिने आणि कॅश घेऊन  पळून गेले. खार येथून ते सीएसटी रेल्वे स्थानकात आले आणि गितांजली एक्सप्रेसला ओरिसाला पळून जाण्याच्या तयारीत होते. हत्येची माहिती खार पोलिसांना मिळाली.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकातील योगेश शिंदे, नंदकुमार गोपाळे, लोणकर, खलील शेख, निलोफर शेख व अन्य पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली होती. हत्येनंतर त्यांच्या घरातील सुरेखा ऊर्फ पार्वती ही महिला केअरटेकर पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. तिने स्वतःचा फोटो आणि इतर कोणतीही माहिती मखिजानी यांना दिली नव्हती, तिचा मोबाईल क्रमांक एका डायरीत होता, मात्र ते पानही तिने फाडून फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे  तिची माहिती काढण्यावर पोलिसांनी भर दिला. ही माहिती काढताना पार्वती ही नियमित एका दुकानात जात होती, त्यातील एका दुकानदाराकडे तिचा मोबाईल क्रमांक पोलिसांना सापडला. सीसीटिव्ही फुटेजवरुन पार्वतीचा फोटो पोलिसांना प्राप्त झाला, तिच्या मोबाईलवरुन ती सिंधासन एक्का या तरुणाच्या संपर्कात होती, या दोघांचेही मोबाईल लोकेशन  खार परिसरात होते. त्यामुळे या दोघांचा या दुहेरी हत्येत सहभाग उघडकीस आला. सीएसटी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये ती गितांजली एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत होती, त्यामुळे नागपूर रेल्वे पोलिसांच्या मदतीने खार पोलिसांनी दोघांनाही नागपूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलेे.