Sat, Feb 16, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केसरकरांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही

केसरकरांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:15AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे गांभीर्य नाही. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुण आत्महत्या करीत असताना, केसरकर यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी केल्याचा कन्‍नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आरोप केला. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ठिय्याही दिला.

मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी सोमवारी मंत्रालयासमोर महात्मा गांधी पुतळ्याखाली ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गृह राज्यमंत्री केसरकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी शिवसेना आमदारांच्या बैठकीला पोहोचलो असता केसरकर यांनी काय कसे चाललेय, मजेत आहात ना? अशी खोडसाळ टिपणी केल्याचे जाधव यांनी सांगितले.एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दररोज तरुण आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रात आगडोंब उसळला आहे. असे असताना राज्याचा गृह राज्यमंत्री इतक्या सहजतेने कसा वावरू शकतो, असा सवालही त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारा मी पहिला आमदार आहे आणि मलाच मजेत आहेत ना, अशी विचारणा करणे कितपत योग्य आहे, असा सवालही जाधव यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी सरकारने तत्काळ वटहुकूम काढावा. सरकारला वाटत असेल की, हा वटहुकूम न्यायालयात टिकणार नाही. मात्र, तोपर्यंत मागास आयोगाचा अहवालही  सादर होईल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल, असे जाधव म्हणाले. दरम्यान, मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यास बंदी असल्याने जाधव यांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी समजूत काढल्यानंतर जाधव यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले.