Sun, Aug 18, 2019 15:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युग तुलीचा जामीन फेटाळला

युग तुलीचा जामीन फेटाळला

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील  आरोपी आणि मोजोस बिस्त्रो रेस्तराँचा सहमालक युग तुलीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी तुलीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

डिसेंबर 2017 मध्ये कमला मिलला आग लागून झालेल्या दुर्घटनेचा तपास करत असलेल्या पोलिसांनी पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर युग तुलीला जानेवारीमध्ये अटक झाली. त्याने सुरुवातीला सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता़  तेथे अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली.

कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीची दुर्घटना ही वन अबोव्हच्या कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे घडली, असा दावा  करताना आगीत प्राण गमवावा लागलेल्या लोकांमध्ये मोजोस बिस्त्रो रेस्टॉरंटमधील पाहुण्यांपैकी कोणाचा समावेश नव्हता, असा दावा तुलीच्या वतीने वकील शिरीष गुप्ते यांनी केला़.  

यावेळी सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी तुलीच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवताना आगीच्या दुर्घटनेला तुली व इतर सर्व आरोपींचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा करून जामीन अर्ज फेटाळून देण्याची विनंती केली. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी तुलीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Tags : Mumbai, mumbai news, Kamla Mills, fire, accident case,