होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युग थुलीच्या शोधासाठी मुंबई पोलीस हैद्राबादमध्ये

युग थुलीच्या शोधासाठी मुंबई पोलीस हैद्राबादमध्ये

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:21AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी हवा असलेला आरोपी युग रविंद्रपालसिंग थुली याच्या शोधासाठी पोलीस पथक हैद्राबादमध्ये पोहोचले आहे. थुली हा पत्नीसोबत आजी-आजोबांकडे पोहचल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हैद्राबादमध्ये धाव घेतली खरी, मात्र थुली याची फक्त कार पोलिसांच्या हाती लागली. दरम्यान, गुन्ह्यातील पाहिजे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके रवाना केली असून यातील चार पथके मुंबईसह राज्यात, तर तीन पथके राज्याबाहेर आरोपींचा शोध घेत आहेत.

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चार तर भायखळा पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही आग वन अबव्हमध्ये लागल्याच्या प्राथमिक तपासाअंती मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

अग्निशमन दलाच्या अहवालानंतर पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आणि मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठक याच्यासह युग थुली याची नावे गुन्ह्यात वाढविण्यात आली. पाठक याला पोलिसांनी अटक केली. मात्र गुन्हा दाखल झाल्याचा सुगावा लागल्याने 5 जानेवारीपर्यंत पोलिसांच्या संपर्कात असलेला थुली पसार झाला. विमानतळावरून तो पत्नीसोबत पलायन करणार होता, परंतु पोलीस तेथे पोहोचल्याने कारने हैद्राबाद येथील आजी-आजोबांकडे गेला. याची माहिती मिळताच हैद्राबादमध्ये पोहोचलेल्या पोलीस पथकाला थुली सापडला नाही. मात्र त्याची कार सापडली आहे. थुली याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून गुरुवारी या अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते.

वन अबव्हचा मालक आणि गुन्ह्यातील  आरोपी अभिजीत मानकर याची गाडी घराबाहेर सापडल्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कसून चौकशी करत हॉटेल व्यावसायिक विशाल कारिया याला अटक केली. न्यायालयाने कारियाला 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कारिया याने गुन्ह्यातील आरोपींची सेटिंग करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती खात्रीलायक पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र कारिया याने आरोपींशी आपला काहीच संबंध नसून फक्त गाडी ठेवण्यासाठी अभिजीत मानकर आपल्याला भेटल्याचा दावा पोलिसांकडे केला आहे.