Mon, May 27, 2019 06:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आगीचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास

कमला मिल आगीचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास

Published On: Jan 09 2018 2:03AM | Last Updated: Jan 09 2018 1:30AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागून दहा दिवस उलटले तरी आरोपींचा शोध लागत नसल्याने याप्रकरणी गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणी चौकशी सुरू असून तपासाअंतीच आरोपींना अटक करण्यात येईल असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

लोअर परळच्या  कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीत असलेल्या वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये 14 जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. 

याप्रकरणी वन अबाव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह येथील व्यवस्थापक, संचालक व अन्य जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र आरोपी काही सापडत नसल्याने अखेर गुन्हे शाखेने याप्रकरणी समांतर तपास सुरू केला आहे.

आगीप्रकरणी अग्निशमनदलाने अहवाल सादर केल्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मोजेस बिस्त्रोचा मालक युग पाठक आणि युग थुली यांची नावे नोंदवत पाठकला बेड्या ठोकल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच तपासअंती दोषी आरोपींविरोधात अटकेची पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.