Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिका अधिकार्‍यांना आम्ही लाच दिली!

कमला मिल आग; पालिका अधिकार्‍यांना आम्ही लाच दिली!

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 1:30AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेतील लाचखोरी मुंबईकरांना नवी नाही. मात्र पाकीट मिळाले की लोकांच्या जीवावर बेतणार्‍या परवानग्याही कशा दिल्या जातात याचाच एक धक्‍कादायक खुलासा झाला आहे. तब्बल 14 जणांचे बळी घेणार्‍या कमला मिल दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या दोन्ही रेस्ट्रो बारच्या मालकांनी पालिका अधिकार्‍यांना वेळोेवेळी लाच दिल्याची कबुली दिली आहे. 

अनियमिततांबद्दल आम्हाला वेळोवेळी नोटीस बजावण्यात येत होती. मात्र प्रत्येक वेळी आम्ही अधिकार्‍यांना लाच दिली, असे दोन्ही हॉटेलच्या मालकांनी म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या मालकांनी जी साऊथ वॉर्डच्या अधिकार्‍यांची नावेही सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरपूर लाच घेतलेल्या तीन ते चार अधिकार्‍यांची नावे आम्हाला सांगण्यात आली असून, आम्ही या दाव्याचा शहानिशा करीत आहोत, असे एका अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. 

पोलिसांनी या प्रकरणी डझनभराहून अधिक पालिका अधिकार्‍यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कमला मिलमधील अनियमिततांकडे कोणत्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले याची कसून चौकशी करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने दोन्ही हॉटेल्सना 10 ते 12 नोटिसा बजावल्या होत्या. मात्र तरीही दोन्ही हॉटेल्स सुरळीत सुरू होती. 

ज्या अधिकार्‍यांची नावे आरोपींनी घेतली आहेत, त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले तर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आयपीएससीच्या कलम 304 अंतर्गत (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा )कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही हॉटेल्सच्या मालकांवर याच कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पालिकेतील एका अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, लाच घेतलीच नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र तो आता तपासाचा भाग आहे. पोलिसांना हा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करावे लागतील. यापूर्वीही असे आरोप झाले आहेत, त्यानंतर पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्‍तांनीही आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, 10 अधिकार्‍यांविरोधात कारवाईची शिफारस केली आहे. 1 अबव्हला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याबद्दल अग्‍निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांना गेल्याच आठवड्यात अटक करण्यात आली आहे. एन एम जोशी मार्ग पोलीस स्थानकातील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार या दोन रेस्ट्रो बार्सविरोधात खुपवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ हॉटेल सुरु ठेवणे, जेवण्याच्या ठिकाणी हुक्‍का देणे, मोठ्या आवाजात संगीत लावणे, अशा स्वरुपाच्या तक्रारींचा त्यात समावेश होता. वन अबव्ह विरोधात तर 9 वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. यात तीनवेळा कोप्टा अंतर्गत, मोठ्या आवाजात गाणी लावल्याबद्दल पाचवेळा आणि हुक्‍का दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.