Sat, Jun 06, 2020 23:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साकीनाका गांभीर्याने घेतले नाही म्हणून कमला मिल अग्निकांड

साकीनाका गांभीर्याने घेतले नाही म्हणून कमला मिल अग्निकांड

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:58AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेने हॉटेल्समधील  अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम हाती घेतली असती तर कमला मिल दुर्घटनेत 14 निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागला नसता. पण दबाव आल्याशिवाय आणि स्वत: अडचणीत आल्याशिवाय कोणतीही अ‍ॅक्शन होत नसल्याचे शनिवारच्या धडक कारवाईने सिद्ध झाले आहे. 

साकीनाका फरसाण मार्टला लागलेल्या आगीत 12 गरीब कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेमुळे अनेक कामगारांचे संसार रस्त्यावर आले असून याचे सोयरसुतक पालिका प्रशासनाला नाही. साकीनाक्याची मोठी दुर्घटना घडूनही चौकशी समिती पलीकडे एकाही अधिकार्‍यावर कारवाई केली नाही. विशेष म्हणजे या घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई होणे अपेक्षित होते. पण स्थायी समितीसह महापालिका सभागृहाने अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. कमला मिलमधील वन अबाव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेल्यानंतर मात्र पालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. का तर तिथे श्रीमंतांचा जीव गेला म्हणून ? याच प्रशानची सध्या सर्वत्र जारदार चर्चा सुरू आहे.

कमला मिलच्या या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतल्यामुळे पालिकेने अधिकार्‍यांना निलंबितच केले नाही तर, 24 तासांत कारवाईसाठी हातोडाही हातात घेतला. पालिका प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. साकीनाका आगीनंतर पालिकेने अधिकार्‍यांना घरी बसवून अनधिकृत बांधकामावर कारवाई केली असती तर, पालिका आयुक्त अजोय मेहता स्वत: अनधिकृत बांधकामाच्या विरोधात असल्याचा मेसेज मुंबईकरांमध्ये गेला असता. एवढेच नाही तर 14 जणांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांमध्ये उमटत आहेत.