Tue, Aug 20, 2019 05:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अग्निसुरक्षेची अंमलबजावणी न करणार्‍या हॉटेल्सना संघटनेचे सदस्यत्व गमवावे लागणार!

अग्निसुरक्षेची अंमलबजावणी न करणार्‍या हॉटेल्सना संघटनेचे सदस्यत्व गमवावे लागणार!

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:18AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

हॉटेलमध्ये अग्निसुरक्षेची अंमलबजावणी न करणे आता हॉटेलचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. जे हॉटेलचालक याचे पालन करणार नाही त्या हॉटेलचालकांना आहारसह अन्य संघटनांचे सदस्यत्व न देण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केलेल्या या सूचनेचे हॉटेल संघटनांनी स्वागत केले आहे. 

कमला मिलमधील वन अबव्ह पबला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील उपाहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांचे, तसेच आरोग्य व इमारतविषयक नियमांचे परिपूर्ण पालन केले जाऊन उपाहारगृहे ही अधिकाधिक सुरक्षित व अधिक चांगल्या दर्जाची व्हावीत, या उद्देशाने महापालिका प्रशासन कामला लागले आहे. याबाबत आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनांची विशेष बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली. या बैठकीत अग्निसुरक्षेतेसह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. 

अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीच्या अनुषंगाने असणार्‍या संबंधित नियमांच्या पालनाबाबत संघटनेच्या स्तरावरदेखील एक यंत्रणा विकसित करावी, अशी सूचना मांडण्यात आली. या यंत्रणेमार्फत अग्निसुरक्षाविषयक प्रतिबंधात्मक तपासणी नियमितपणे करावी. त्याचबरोबर संघटनेचे जे सदस्य हे नियम पाळणार नाहीत, त्यांना सदस्य करून घेऊ नये, किंवा जे सदस्य असतील, त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी एक सूचना महापालिका आयुक्तांनी मांडली. 

उपाहारगृहांच्या तिन्ही संघटनांनीदेखील यानुसार आवश्यक ते सहकार्य करण्याचे मान्य करीत सदर सूचनेचा स्वीकार करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे संघटनेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आता हॉटेल व्यवसायिकांना नियमाचे पालन करणे बंधनकारक होणार आहे.