Mon, Apr 22, 2019 15:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोजोस बिस्रोच्या युग तुलीची शरणागती

मोजोस बिस्रोच्या युग तुलीची शरणागती

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:35AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी पाहीजे आरोपी युग रविंद्रपालसिंग तुली याने अखेर मंगळवारी ना. म. जोशी मार्ग पोलिसांसमोर शरणागती पत्करली. गेले दहा दिवस तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झालेल्या थुलीला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या रेस्टोपबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाल्याप्रकरणी वन अबव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. अग्निशमनदलाच्या अहवालानंतर मोजोस बिस्त्रोचे मालक युग पाठक आणि युग तुली यांची नावे गुन्ह्यात वाढविण्यात आली. पाठक याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच 5 जानेवारीपर्यंत पोलिसांच्या संपर्कात असलेला थुली पत्नीसोबत पसार झाला. कमला मिलमधील थुलीच्या रेस्टो पबला आग लागण्याच्या 15 दिवस आधी त्याचा विवाह झाला होता.

तुलीच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस बजावत त्याच्या शोधासाठी मुंबईसह महाराष्ट्र आणि परराज्यांमध्ये पथके रवाना केली. चेंबुरमधील राहात्या घरामधून जीपने तो पत्नीसोबत हैद्राबादमधील आजी-आजोबांकडे गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तेथेही छापा टाकला, परंतू तोपर्यंत तो तेथून निसटला होता. त्याची फक्त कार पोलिसांना सापडली. तेथून अमृतसरमध्ये पोहचलेले तुली दाम्पत्य याच दरम्यान, त्याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात केलेला अर्जवरील सुनावणीची वाट बघत होते. न्यायालयाने फेटाळल्याने त्याच्यासमोरील सर्व दरवाजे बंद झाले. अखेर मंगळवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांसमोर शरणागती पत्करली.