Fri, Jul 19, 2019 19:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आगीची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

कमला मिल आगीची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:53AMमुंबई : प्रतिनिधी 

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो या पबमध्ये आग लागून  14 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिले. दरम्यान, या भीषण आगीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अकरा आरोपींचे जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावले़ 

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह पब व मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या आगीची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका माजी आयपीएस अधिकारी ज्युलीओ रिबेेलो यांनी दाखल केली आहे. या याचिकेबरोबरच अन्य दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. या आगीची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तर पालिकेने आयुक्तांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली आहे. तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, अशी भूमिका घेऊन न्यायालयामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यास विरोध केला होता. मात्र उभयपक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले.  

काँगे्रसकडून स्वागत

कमला मिल येथील वन अबव्ह आणि मोजोस या पबला लागलेल्या आगीत 17 जणांचा नाहक बळी गेला. याला मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता सर्वस्वी जबाबदार आहेत. महापालिका आयुक्त स्वतःच जबाबदार असतील तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी करणार? म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करत होतो. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे. 

सत्र न्यायालयाने आरोपींचे जामीनअर्ज फेटाळले या आगीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अकरा आरोपींचे जामीनअर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावले़  आरोपींच्या जामीनअर्जांना सरकारी वकीलांनी केलेला जोरदार विरोध मान्य करून सत्र न्यायाधीश ए़  एल़  यवलकर यांनी आरोपींचे जामीनअर्ज फेटाळून मोठा दणका दिला़ कमला मिल्सचे अग्नितांडव हा निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी कमला मिल्सचा मालक रमेश गोवाणी, संचालक रवी भंडारी, वन अबव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर, मोजोच्या बिस्त्रो पबचे मालक युग तुली आणि युग पाठक, अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील, वन अबव्हचा व्यवस्थापक केविन बावा आणि सहाय्यक व्यवस्थापक लिस्बन लोपेज यांना अटक केली होती़.  

या सर्वांनी सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी जामीनअर्जाला विरोध करताना घटनेचे भीषण स्वरुप विचारात घेऊन आरोपींचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती केली. त्यावर बचावपक्षाने युक्तिवाद पूर्ण केला़  उभय पक्षांच्या युक्तिवाद झाल्यानंतर सत्र न्यायाधीश ए़  एल़  यवलकर यांनी आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले़.