होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल दुर्घटना : जागामालकास जामीन

कमला मिल दुर्घटना : जागामालकास जामीन

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

लोअर परळच्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील  अटकेत असलेले  प्रमुख आरोपी आणिकमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक रमेश गोवानी आणि कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती व्ही. एल. अचलीया यांनी रोख दोन लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. तसेच  50 हजार रुपये जाचमुचलक्याच्या कागदपत्रांची दोन आठवड्यात पूर्तता करावी असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.
कमला मिल कंपाउंडमधील पबमध्ये 29 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या अग्नितांडवात 14 जण मृत्यमुखी पडले होते. तर 55 जण जखमी झाले होते. या प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी पब

मालक तसेच जागेचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी  यांच्यासह 14 जणांना जानेवारीमध्ये अटक केली होती. त्यानंतर गेली चार महिने तुरूंगात असलेल्या रमेश गोवानी आणि रवी भंडारी  यांच्यावतीने  उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने या जामीन अर्जावर 16 मेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलीया यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. सुदीप पासबोला यांनी युक्तीवाद करताना ज्या दोन हॉटेलमध्ये  दुर्घटना झाली ते भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. त्यामुळे या अग्निकांड प्रकरणाशी गोवानी आणि भंडारी यांचा संबंध नसल्याने त्यांच्या विरोधात कलम 304 खाली  करण्यात आलेली कारवाई गैर असल्याने जामीन द्यावा अशी विनंती केली. तर या अर्जाला राज्य सरकारच्यावतीने जोरदार विरोध करण्यात आला. 

सरकारच्यवतीने विरोधकरताना काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. मिलमध्ये हुक्का पार्लर चालविल्या जाणार्‍या दोन पबमध्ये आग लागली ती दोन्हीही हॉटेल्स भाड्याने देण्यात आले होते, तसेच याठिकाणी आय टी पार्कच्या कामासाठी  महापालिकेने परवानगी दिलेली असताना तेथे टेरेसवर हॉटेल बांधण्यात आली. त्यात अनधिकृत बांधकाम झाले. तसेच या दोन्ही मालकांची कार्यालये या ठिकाणी आहेत, या सर्व गोष्टीची जबाबदारी मालक म्हणून गोवानी आणि भांडारी कसे नाकारू शकत नाहीत? आदी मुद्दे मांडण्यात आले. शिवाय त्याला हे दोन्ही मालक जबाबदार असून, जामीन मिळाल्यास ते साक्षीदार फोडण्याचे शक्यता असल्याने जामीन मंजूर करून नये अशी विनंती सरकारतर्फे करण्यात आली. तर पिडीतांच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश वाघ यांनीही जामीन अर्जाला विरोध केला.