Fri, Apr 26, 2019 15:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिगारेट-विडी बहाद्दराकडून अनाहूत कृत्य!

सिगारेट-विडी बहाद्दराकडून अनाहूत कृत्य!

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 1:14AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याणच्या आधारवाडी-वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली असून, आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे स्वरूप इतर आगींपेक्षा वेगळे असल्याने ती आटोक्यात आणणे अवघड आहे.  धुमसणार्‍या डम्पिंगला शमायला किमान आठवडा लागणार आहे. तोपर्यंत दुर्गंधी आणि धुराचा त्रास या परिसरात राहणार्‍या रहिवाशांना सहन करावा लागणार आहे. दरम्यान, एखाद्या पेटत्या विडीने सारी यंत्रणा वेठीस धरल्याची माहिती हाती आली आहे. डम्पिंगवर कचरा टाकायला जाणार्‍या किंवा तो वेचायला येणार्‍या एखाद्या सिगारेट-विडी बहाद्दराकडून असे कृत्य अनाहूतपणे घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी या डम्पिंगला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. त्यातून निघणार्‍या धुराचे लोट डोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली, भिवंडी, उल्हासनगपर्यंत पसरत चालले आहेत. केडीएमसीचे 4, अंबरनाथ एमआयडीसीचा 1 आणि 20 ते 25 टँकरनी दररोज ही आग शमवण्याचे अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र फवारणारे पाणी जोपर्यंत खोलपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत ही आग धुमसतच राहणार असल्याचे जाणकार तज्ज्ञांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. आग विझवण्यासाठी भिवंडी, नवीमुंबई महापालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. पण डम्पिंग ग्राऊंडचा परिसर मोठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे.

15 एकर जागेत हे डम्पिंग ग्राऊंड असल्याने आगीवर इतक्या लवकर नियंत्रण मिळवता येणार नाही. किमान 8 दिवस त्यासाठी काम करावे लागेल. सध्या खाडीत पाईप टाकून पाणी घेतले जात आहे. तसेच आधारवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी घेऊन आग विझवली जात आहे. डम्पिंगची आग विझवण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. नदी, खाडी आणि साठेनगर या तिन्ही बाजूने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी 3 उपायुक्त आणि 3 कार्यकारी अभियंत्यांची टीम कार्यरत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे काम करत आहेत. डम्पिंगच्या चारही बाजूंनी आग विझली असली तरी मध्यभागी अजूनही ती कायम आहे. रस्ता नसल्याने अग्निशामक दलाची गाडी तिथपर्यंत पोहचू शकत नाही. जवळच्या साठेनगर झोपडपट्टीजवळून डम्पिंगवर जाण्यासाठी रस्ता प्रस्तावित आहे. तेथून रस्ता असता तर अग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यास फारसा वेळ लागला नसता, असेही जाणकार तज्ज्ञांचे मत आहे. मात्र त्यासाठी परिसरातील रहिवाशांचे पुनर्वसन झाले तरच ते शक्य होणार आहे. वाडेघर बाजूकडील गणपती कारखान्याकडून कसाबसा हा रस्ता काढण्यात आला आहे. सध्या त्या बाजूने अग्निशामक दलाचे बंब आणि टँकर ये-जा करत आहेत.  एक टँकर 25 ते 30 मिनिटे पाण्याचा मारा करू शकतो. मात्र दुसरा टँकर येईपर्यंत वेळ जास्त होतो आणि आग पुन्हा धुमसू लागते.