Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणचे उड्डाणपूलही टेकण्याच्या मार्गावर!

कल्याणचे उड्डाणपूलही टेकण्याच्या मार्गावर!

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 05 2018 1:35AMकल्याण : सतीश तांबे

कल्याणातील दुर्गाडी पूल, मोहने गावालगत असलेल्या उल्हास नदीवरील पूल, कल्याणचा ब्रिटिशकालीन पत्रीपूल आदींची अवस्थाही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महापालिका क्षेत्रातील नाले, रेल्वे ट्रॅक, खाडीवर बांधलेल्या पुलांपैकी अनेक पूल 40 ते 50 वर्षे जुने झाले आहेत. अंधेरी येथे मंगळवारच्या दुर्घटनेतून बोध घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेसह रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी या धोकादायक पुलांच्या डागडुजीकडे वेळीच लक्ष देईल का की, एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत बसणार? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. 

कल्याणातील ब्रिटिशकालीन पत्रीपूल 100 वर्ष जुना असून, हा पूल सद्यस्थितीत जीर्ण झाला आहे. या पुलाचे आयुर्मान संपल्याचे पत्र राज्य शासनाला ब्रिटिश सरकारने पाच वर्षापूर्वी पाठविले आहे. या पुलावरून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातल्याची सूचना करण्यात आली होती. मात्र या पुलावरून आजही जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. गेल्या वर्षी याच जुन्या पत्री पुलाचा भाग पावसाळ्यात खचला होता. एखादी दुर्घटना घडल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीची चर्चा होत असली तरी कागदी घोडे नाचवण्यापलीकडे या पुलाच्या डागडुजीबाबत गांभीर्याने विचार करण्यात आलेला नाही. कल्याणजवळील उल्हास नदीवरील 70 वर्षाहून अधिक जुना असलेला मोहने पूलही धोकादायक स्थितीत आहे. एनआरसी कंपनीने 1942 साली हा पूल उभारला आहे. केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या या पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या असून, या पुलावर उगवलेल्या झाडांनी आपली मुळे खोलवर रुजवली आहेत. वाहनांची ये-जा सुरू असल्यास पूल कंपन पावतो. कल्याण-शीळ रोडवरील देसाई खाडीवरील पुलाचीही दुरवस्था झाली आहे. या पुलाला सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक जाहीर केले असले तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या गोविंदवाडी बायपासच्या मध्ये येणार्‍या कलवड पूल (जरीमरी पूल) देखील धोकादायक झाला असून प्रशासनाच्या धोकादायक पुलाच्या यादीत त्याची नोंद आहे.

कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दुर्गाडी पुलाच्या पिलरची रिंग तुटल्यामुळे या पिलरची डागडुजी करण्याची मागणी 4 वर्षांपासून केली जात आहे. मात्र या पिलरची अद्यापि डागडुजी करण्यात आलेली नसून या पुलाला पर्यायी ठरणार्‍या 6 पदरी पुलाचे काम जागेच्या वादात अडकले आहे. या पुलावर होत असलेल्या वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडण्यापेक्षा दुचाकी चालक 150 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बंद केलेल्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. बांधकाम विभागाने जुना पूल रहदारीसाठी धोकादायक असल्याचा फलकही या ठिकाणी लावला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून दुचाकीस्वार सर्रास या पुलावरून ये-जा करतात. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा पूल पाडून टाकण्याची विनंती पोलिसांनी शासनाकडे केली आहे. मात्र, या पूल निष्कासित करण्यास मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे.