Fri, Apr 26, 2019 01:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डान्सबार बंदीचा कल्याणमध्ये फज्जा!

डान्सबार बंदीचा कल्याणमध्ये फज्जा!

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:06AMडोंबिवली : वार्ताहर

वादग्रस्त कशिश बार अँड डिस्को रेस्टॉरंटमध्ये नर्तिकांकडून ‘मेरे रश्के कमर तुने पेहली नजर’ या गाण्यावर तोकडे कपडे परिधान करून अश्लील नृत्य करून घेणार्‍या व त्या नर्तिकांवर पैसे उडवणार्‍या आंबटशौकीनांसह बार मॅनेजर, कॅशियर व वेटर अशा 12 जणांवर ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेच्या पथकाने धाड टाकून अटकेची कारवाई केली आहे. या प्रकाराने कल्याणात डान्सबार बंदीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेकडे मलंग रोडवरील कशिश बार अँड डिस्को रेस्टॉरंटमध्ये बारबालांचा नंगानाच सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेच्या पथकाने या बारवर धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच बारमधल्या आंबटशौकीनांची बोबडीच वळली. यावेळी बारचे परवानाधारक समशेर सिंह, बार चालक सुहास गोळे, मॅनेजर वेदप्रकाश पांडे, कॅशियर अरुण हेगडे, वादक सत्यजित बरुवा यांच्यासह 7 वेटर्स यांनी तब्बल 19 अर्धनग्नावस्थेतील बारबालांना ‘मेरे रश्के कमर तुने पेहली नजर’ या गाण्यांवर तोकडे कपडे परिधान करून अश्लील नृत्य करून अंगप्रदर्शन करण्यास भाग पाडले, तसेच या महिला नर्तिकांवर बारमध्ये बसलेले गिर्‍हाईक पैसे उडवत होते.

बारला दिलेल्या परवान्यामधील अटींचे उल्लंघन करून बारमध्ये वेटर म्हणून ठेवण्यात आलेल्या बारबालांचे नोकरनामे नसताना, तसेच परवानगी नसतानाही कानठळ्या बसविणार्‍या डीजेच्या मोठ्या आवाजात अश्लील व विभित्स हावभावाचे नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी  बार परवानाधारकासह, चालक, वेटर्स, अशा 12 आरोपींसह 19 बारबाला, तसेच आंबटशौकीन ग्राहकांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार एस. एस. केदार करीत आहेत.