डोंबिवली : वार्ताहर
प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून घराणेशाही चालत असल्याचा गंभीर आरोप करत युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला. ठाणे जिल्ह्यातील युवासेनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत केडीएमसीचे शिवसेना नगरसेवक तथा युवासेना पदाधिकारी श्रेयस समेळ यांनी आपल्या युवसेना उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड झाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक राजकारणातील घराणेशाहीला कंटाळून राजीनामा देत आहे. मी सुरुवातीपासूनच पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत आहे. मात्र, त्याची दखल न घेता केवळ घराणेशाही, लाळघोटेपणा आणि नेत्यांचे पाय धरणाऱ्या व्यक्तींना युवासेनेच्या नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याचा आरोप श्रेयस समेळ यांनी केला आहे.
श्रेयस समेळ यांच्यावर युवासेनेच्या स्थापनेपासून कल्याण युवासेना उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पक्ष बांधणीपासून प्रत्येक आंदोलनात, कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग राहिला आहे. परंतु आता या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याचे सांगत समेळ यांनी युवासेना जिल्हाधिकारी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सांगितले.