होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवली-मोहने-टिटवाळा शहरात भूकंपासारखे धक्के

कल्याण-डोंबिवलीसह परिसराला भूकंपासारखे धक्के

Published On: Jul 13 2018 11:00PM | Last Updated: Jul 13 2018 11:08PMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली पासून कल्याण, मोहने ते टिटवाळ्यादरम्यान धरणीकंप झाल्यासारखे सौम्य हादरे बसल्याचे वृत्त आहे. अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे भयभीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मात्र धरणीकंप झाल्याच्या वृत्ताला शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

खड्ड्यांमुळे बळी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमूळे आधीच भितीच्या सावटाखाली असणारे कल्याण-डोंबिवलीकर रात्री साडेनऊच्या सुमारास बसलेल्या गूढ धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरलेले पहायला मिळाले. कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती हाती आली. मात्र हे हादरे बसले ते भूकंपाचे होते की आणखी कशाचे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 33 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 2 ते 3 मिनिटे हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण-डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी दिली. अचानक बसलेल्या या गूढ हादऱ्यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱ्यांमूळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली. याबाबत ठाणे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता या हादऱ्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे हादरे म्हणजे भूकंपाचा सौम्य धक्का होता की नुसतीच कंपने होती, ते अधिकृत माहिती आल्यानंतरच स्पष्ट होईल, असेेेही सांगण्यात आले. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले.

दरम्यान, जवळची सर्व धरणे (डॅम) भरत चालली आहेत. यावर्षी पावसाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर पाणी पसरले आहे. धरणावर पडणाऱ्या दाबाने भूकंपाचे सौम्य झटके जाणवले असावेत, असे पॉजचे संस्थापक निलेश भणगे माहिती देताना म्हणाले.