Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीत बंदला हिंसाचाराचे गालबोट 

कल्याण-डोंबिवलीत बंदला हिंसाचाराचे गालबोट 

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:27AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याचे पडसाद डोंबिवली-कल्याणच्या शहर व ग्रामीण परिसरात सर्वत्र उमटले. आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोको, रेल रोको करून निषेध नोंदविला. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.

डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या रेल्वे स्थानकात 5 नंबर फलाटाजवळ असलेले तिकीट काऊंटर आंदोलकांनी 12.20 च्या सुमारास फोडले. अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे या काऊंटरमधील संगणकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर रेल्वे स्थानकात घुसून संतप्त जमावाने रुळावर ठाण मांडले. रेल रोकोसाठी जमावाने फलाटावर पडलेल्या सिमेंट-रेतीच्या भरलेल्या गोण्या उचलून रुळावर टाकल्या. या जमावाने 3 नंबर फलाटावर आलेल्या मुंबई-सीएसटी लोकलनंतर हैदराबाद-मुंबई ही मेल 5 नंबर रोखून धरली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हैदराबाद-मुंबई ही मेल 5 नंबर वरून 15 मिनिटांनी सोडण्यात आली. लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या 15 ते 20 मिनिटांपासून रोखून धरल्या होत्या. कल्याणमध्येही जमाव आक्रमक झाला होता. कल्याणच्या पत्री पुलाजवळदेखील शेकडो आंदोलकांनी रुळावर उतरून रेलरोको केला. 

कल्याण-डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर, तसेच फलाटांवर उतरलेल्या जमावाने सरकारविरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला.सकाळपासूनच कल्याण आणि डोंबिवलीत रस्त्यावर उतरून जमावांनी हिंसाचार सुरू केला होता.  कल्याणच्या पत्री पूल परिसरात 3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 

कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या शहाड चौक, प्रेम ऑटो भागात रस्ता रोको करण्यात आला. यावेळी चित्रीकरण करणार्‍यांचे मोबाईल जमावाने फोडले. शिवाजी चौकात असलेल्या शिवसेना मध्यवर्ती शाखेवर दगडफेक करण्यात आली. कल्याण पूर्वेतही आंबेडकरवाद्यांनी रस्त्यावर उतरून दुतर्फा असलेली दुकाने बंद केली. भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी करीत पुना लिंक रोडवर ठिकठिकाणी केला रस्ता जाम केला. चिंचपाडा रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 - 8 वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत रस्ता रोको करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीच्या मुख्य चौका-चौकात आंबेडकरवादी अनुयायांची मोठी गर्दी करून रास्ता रोको केला. आंदोलन सुरू असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. सर्व व्यापारी बांधव आणि रिक्षा चालकांनी या बंदमध्ये उत्स्फूतर्र्पणे सहभाग घेतला होता.