Wed, Apr 24, 2019 01:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डम्पिंग आग केडीएमसी आयुक्तांना भोवली!

डम्पिंग आग केडीएमसी आयुक्तांना भोवली!

Published On: Mar 17 2018 2:01AM | Last Updated: Mar 17 2018 2:01AMकल्याण : सतीश तांबे

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आटोक्यात आणण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेले पालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांची अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीतच शासनाने तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी गोविंद बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिकेच्या वायफळ खर्चाला कात्री लावली. तसेच प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडे देण्याचे काम त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून केले. मागील आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असलेली घोडदौड वेलरासू यांनीही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. कचराप्रश्नी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. मात्र गेल्या आठवड्यात पालिकेच्या आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अपयशी ठरल्याने व राजकीय पक्षांनी रस्तारोको, निषेध, ठिय्या आंदोलने केल्याने आयुक्त वेलरासू वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. अखेर शासनाने शुक्रवारी सकाळी त्यांची एमएसआरडीसी विभागात संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (जॉईन्ट एमडी) पदी नियुक्ती केली आहे.

नव्या आयुक्तांना बदल रुचतील का?

ऐन बजेट सादर करणाच्या दरम्यानच आयुक्तांची बदली झाल्यामुळे भाजपाच्या गोटातून नाराजी व्यक्त केली जात आहे. वेलरासू यांनी एक ठरावीक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन बजेट तयार केले होते. नव्या आयुक्तांची बजेटबद्दल काय भूमिका असेल? आयुक्तांशी चर्चा करून सुचविलेले बदल नव्या आयुक्तांना रुचतील का? याबाबतही साशंकता आहे. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आयुक्तांची बदली झाली नसती तर बरे झाले असते, असा सूर भाजप नगरसेवकांकडून आळवला जात आहे.

विरोधाची पर्वा न करता 2018-19 च्या बजेटमध्ये वेलरासू यांनी धाडसीपणा दाखवला. विकासकामांसाठी 1 हजार 698 कोटी रुपयांपैकी तब्बल 738 कोटींच्या निधीची तजवीज केली. कचर्‍यापासून मुक्तीसाठी तयार होणारा कचरा जाळून त्यातून थेट वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेत त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली.

सरकारने माझी बदली कोणत्या कारणामुळे केलेली नाही. माझी बदली ही रेग्युलर आहे. मला बढती मिळाली आहे. दहा महिन्यांच्या कालावधीत काम करीत असताना खूप चांगला अनुभव आला. काही कठोर निर्णय घेतले. कोणाला आवडले नसतील तरी ते घेतले असे त्यांनी सांगितले. - पी.वेलरासू

आयएएस अधिकारी हा किमान तीन वर्षे एका महापालिकेत राहिला पाहिजे. मात्र या आधीचे आयुक्त ई. रवींद्रन आणि पी. वेलरासू यांची बदली सरकारने वर्षभरात केली आहे. सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. - राजेंद्र देवळेकर, महापौर

Tags : mumbai, Kalyan Dombivli, Municipal Corporation, dumping ground, fire,