Sat, Jan 25, 2020 08:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैशिष्ट्यपूर्ण ‘कलवरी’ पाणबुडी शत्रूला भारी

वैशिष्ट्यपूर्ण ‘कलवरी’ पाणबुडी शत्रूला भारी

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:54AM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

समुद्रमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ‘कलवरी’ या पाणबुडीच्या रूपाने नौदलाला नवी ताकद मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुुुरुवारी मुंबईतील कार्यक्रमात तिचे राष्ट्रार्पण करण्यात आले. ही पाणबुडी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’चे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. ‘कलवरी’ ही भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी असून तब्बल 17 वर्षांनी नौदलाला पाणबुडी मिळाली आहे. 

गेल्या तीन वर्षांत देशाच्या सुरक्षेशी संबंधित व्यवस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आयएनएस कलवरी हे भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी वाढत असल्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही ते म्हणाले.भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट-75’ अंतर्गत माझगाव डॉक येथे फ्रान्सच्या सहकार्याने या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. पहिली ‘कलवरी’ पाणबुडी भारतीय नौदलात 1967 साली दाखल झाली होती. 1996 मध्ये ही पाणबुडी निवृत्त झाली. 

टायगर शार्कचे नाव

टायगर शार्कच्या नावावरून या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले आहे. स्कॉर्पियन श्रेणीतील कलवरी स्टील्थ तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक लक्ष्यभेद करू शकते. नौदलाच्या ताफ्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने सज्ज असलेली अणुऊर्जेवरील एक पाणबुडी आयएनएस अरिहंत आहे. पुढच्या दोन वर्षांत आणखी दोन पाणबुड्या नौदलात दाखल होणार आहेत; पण चीन आणि पाकिस्तानचे आव्हान पाहता भारताला कमीत कमी 18 डिझेल-इलेक्ट्रिक आणि सहा अणुऊर्जेवर चालणार्‍या पाणबुड्यांची गरज आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

>डिझेल व इलेक्ट्रिक मोटारवर ही पाणबुडी चालते. टायगर शार्कप्रमाणे खोल समुद्रात जाऊन कोणालाही न समजता ‘कलवरी’ शत्रूवर हल्ला करू शकते.

>भारतीय नौदलात सामील होणार्‍या सहा स्कॉर्पियन पाणबुडींपैकी ही पहिली आहे. यावर इन्फ्रारेड आणि कमी प्रकाशात काम करणारे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

>‘कलवरी’वर नौकाविरोधी क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याचा मारा करणारे टॉरपिडो आहेत.