Fri, Apr 19, 2019 12:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळबादेवीतील सुवर्ण कारागिरांचे स्थलांतर!

काळबादेवीतील सुवर्ण कारागिरांचे स्थलांतर!

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 2:02AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील दाटीवाटीची वस्ती आणि मागील काही दिवसांतील आगीच्या दुर्घटनांची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील काळबादेवी परिसरातील सुवर्णकार कारागिरांच्या उद्योगांचे स्थलांतर करण्यात यावे, असे आदेश त्यांनी सोमवारी मुंबई महापालिकेला दिले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी येथील रहिवासी हरकिशन गोरडीया यांनी अग्निसुरक्षेसंदर्भात तक्रार दाखल केली होती. मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत मागील काही दिवसांत घडलेल्या आगीच्या दुर्घटना लक्षात घेता, काळबादेवी येथील घराघरांत चालणार्‍या सुवर्ण कारागिरीच्या व्यवसायांचे स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात महापालिकेने संबंधितांना तीन महिन्यांची नोटीस देऊन कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

काळबादेवीत सुवर्णकार कारागिरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. तेथे असणार्‍या भट्ट्या व धुराच्या चिमण्यांमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. आगीच्या भट्टयांमुळे कुठेही आगीचा धोका उद्भवू नये यादृष्टीने अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे गोरडीया यांनी निदर्शनास आणून दिले.  या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबादेवी, काळबादेवी येथील सुवर्ण कारागिरांच्या व्यवसाय दुसरीकडे हलविण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.