Mon, Aug 26, 2019 01:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसी महापौर निवडणुकीत ‘आगरी वाद’

केडीएमसी महापौर निवडणुकीत ‘आगरी वाद’

Published On: May 10 2018 1:59AM | Last Updated: May 10 2018 1:39AMकल्याण : सतीश तांबे

कल्याण-डोंबिवली महापौर निवडणुकीला वादाचे गालबोट लागले. महापौरपद आगरी समाजाला मिळावे यासाठी शिवसेनेतील आगरी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू होते. पण आगरी समाजाला डावलून विनिता राणे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडल्याने शिवसेनेच्या महिला नगरसेविका व ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती घोलप यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद शिवीगाळपर्यंत पोहोचला. अखेर ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला. 

विशेष म्हणजे हा वाद जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर सुरू होता. याबाबत खासदार शिंदे व गोपाळ लांडगे यांना विचारले असता असे काहीही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर वैजयंती घोलप यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. महापौरपदामुळे नाराज शिवसेनेच्या आगरी नगरसेवकांमध्ये नाराजी उघडपणे दिसून येत होती.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचा अडीच वर्षांचा पहिला कार्यकाळ 11 मे रोजी संपत असल्याने दुसर्‍या अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी बुधवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक झाली. पालिकेत शिवसेना-भाजप युतीची  सत्ता आहे. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. काही दिवसांपासून महापौर शिवसेनेचा की भाजपचा, याबाबत खमंग चर्चा रंगली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौरपदासाठी शिवसेनेच्या विनिता राणे तर भाजपच्या उपेक्षा भोईर यांनी देखील अर्ज दाखल केला. 

तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या उपेक्षा भोईर व अपक्ष नगरसेवक कासिफ ताणकी यांनी अर्ज दाखल केल्याने पुन्हा संभ्रम निर्माण होता. अखेर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर भाजपचा  बसणार असल्याचे सांगत युती कायम असल्याचे स्पष्ट करत हा तिढा सोडवला. निवडणूक कार्यक्रम सुरू होताच भाजपच्या नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी आपला महापौरपदाचा अर्ज मागे घेतला. यामुळे सेनेच्या विनिता राणे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. यानंतर उपमहापौरपदासाठी कासिफ ताणकी यांनीही अर्ज मागे घेतल्याने उपेक्षा भोईर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

2000 सालच्या पालिकेच्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत विश्वनाथ राणे सेनेच्या तिकिटावर प्रथम निवडून आले होते. कोकणचे सुपुत्र नारायण राणे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने नारायण राणे यांचे समर्थक असलेले विश्वनाथ राणे यांनी 2005 सालच्या तिसर्‍या पालिका निवडणुकीपूर्वी सेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर त्यांनी स्वबळावर काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आणले. विश्वनाथ राणे निवडून आलेला प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसने त्यांचे पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पुनर्वसन केले. त्यानंतर 2010 सालच्या चौथ्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा विश्वनाथ राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी काँग्रेस गटनेता, पालिका विरोधी पक्षनेता पद भूषविले होते.

2015 च्या 5 व्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत विश्वनाथ राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली. विश्वनाथ राणे यांचा प्रभाग महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या प्रभागात शिवसेनेच्या तिकिटावर त्यांची पत्नी विनिता राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवून त्याही निवडून आल्या. यानंतर पालिकेत विश्वनाथ राणे यांचे पुनर्वसन करण्यासाठी स्वीकृत नगरसेवकपद बहाल केल्यावर आता अडीच वर्षांनी विश्वनाथ राणे यांच्या पत्नी विनिता राणे यांना महापौरपदाचे मानाचे पद बहाल केले.