Sat, Mar 23, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला भाजपचा विरोध का?

न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला भाजपचा विरोध का?

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:08AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

न्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यु झालेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाने केलेली आहे. मात्र त्याला भाजपचा विरोध का याचे कोडे आम्हाला उलगडलेले नाही, खासदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवीयांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. तत्पूर्वी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने आझाद मैदानात मूक मोर्चा काढण्यात आला.

खुन कोणी केला आहे, हे आम्हालाही माहित नाही त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे सिंघवी म्हणाले. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर उपस्थित होते.

अभिषेक मनु सिंघवी पुढे म्हणाले की काही लोक म्हणत आहेत की हे प्रकरण कोर्टात आहे, कोर्ट प्रकरणात हस्तक्षेप करू नका, या मध्ये राजकारण आणू नका. पण या प्रकरणाची  स्वतंत्र यंत्रणा किंवा समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांची हत्या कोणी केली हे सत्य बाहेर आलेच पाहिजे. 

बी. एच. लोया यांच्या परिवारावरही खूप मोठा दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच त्यांचा मुलगा, त्यांची बहिण आणि त्यांचे काका यांची वेगवेगही विधाने समोर येत आहेत. त्यांची बहिण अनुराधा बियाणी या डॉक्टर असून त्यांनी बी एच लोया यांच्या शवविच्छेदन अहवालावर प्रश्न उपस्थित केलेे आहेत. आरएसएसचा कार्यकर्ता ईश्वर बहेती यांच्याकडून सर्व गोष्टी कळतात हे खूपच संशयास्पद आणि आश्चर्यकारक आहे. त्यांचे शव नागपूरहून मुंबईला न येता परस्पर त्यांच्या गावी लातूरला नेण्यात आले हे देखील संशयास्पद आहे. 

न्यायमूर्ती सारख्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीसाठी कोणतेच सरकारी प्रोटोकोल पाळण्यात आलेले नव्हते. अशा अनेक गोष्टी आहेत त्याची उत्तरे मिळावीत यासाठी आम्ही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आहोत. हे प्रकरण उच्च पातळीवर दडपण्याचा डाव आहे, असाही आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.